Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट; ७ आरोपींविरोधात ९०० पानी आरोपपत्र दाखल

11

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्श कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल आदी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत.

आरोपपत्रात अनेक ठोस पुरावे

विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि शिवानी अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात दाखल झालेल्या या आरोपपत्रात अनेक ठोस पुरावे नमूद आहेत.

गुरुवारी प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात १७३ (८) प्रमाणे पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येईल. ‘डीएनए’ चाचणीसह इतर काही अहवाल येणे बाकी आहे. ते पुरवणी आरोपपत्र सोबत देण्यात येतील.- शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)

रक्तनमुन्यांत बदल; सात जणांवर आरोपपत्र

कल्याणीनगर भागात १८ मे च्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास अल्पवयीन ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. तत्पूर्वी, या मुलाने आपल्या मित्रांसोबत मुंढव्यातील दोन पबमध्ये पार्टी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या मुलाला ससून रुग्णालयात नेले. तिथे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यावेळी या मुलाला वाचविण्यासाठी आरोपींनी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचला. त्यासाठी विशाल अगरवाल याने अशफाक मकानदार याला एका हॉटेलमध्ये चार लाख रुपये दिले होते. मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात घटकांबळे याच्याकडे तीन लाख रुपये दिले. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर याच्या सांगण्यावरूनच घटकांबळेने हे पैसे स्वीकारले. त्यापैकी अडीच लाख रुपये त्याने डॉ. हाळनोरला दिले आणि स्वतःकडे ५० हजार रुपये ठेवले होते, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांकडून हे तीन लाख रुपये जप्त केले आहेत; परंतु उर्वरित एक लाख रुपये कोणाला देण्यात आले हे अद्याप गुलदस्तात आहे. डॉ. हाळनोरने मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून त्याऐवजी शिवानीच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठविला होता. प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालातून ही बाब उघड झाली. मकानदार रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरवडा पोलिस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत आढळून आले.
थातूरमातूर उपचार करून रुग्णांना निर्जनस्थळी सोडायचे, ससूनच्या डॉक्टरांना दणका
आरोपपत्राशी संलग्न कागदपत्रे?

रक्त नमुने बहदलण्याचा सर्व घटनाक्रम, प्रत्यक्षदर्शींसह पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणाचे पंचनामे, तांत्रिक पुरावे, पोर्श कारचा क्रॅश इम्पॅक्ट अॅसेसमेंट अहवाल, न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.