Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ambazari Lake: संसार वाचवा, पूर कधीही येईल! अंबाझरी परिसरातील नागरिकांची धडपड, प्रशासनाबद्दल तीव्र संताप
-महापालिकेकडून तात्पुरत्या उपाययोजना म्हणून तलावाच्या परिसरात केवळ हायड्रोलिक पंप लावण्याची तयारी सुरू आहेत. कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी उपाययोजना मात्र नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप आहे.
-गेल्यावर्षी २३ सप्टेंबरला शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन नाग नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे अंबाझरी लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, यशवंतनगर, डागा लेआउटसह आसपासच्या परिसरांतील वस्त्यांमधील घरे पाण्याखाली आली होती.
-यामुळे घरातील वस्तूंसह, दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या पुरात नागनदीच्या संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले होते. पुरानंतर प्रशासनाकडून पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना अपेक्षित होत्या.
-मात्र, नाग नदीची स्वच्छता, क्रेझी कॅसलमध्ये नदीच्या प्रवाहाल अडथळा ठरलेले पूल वगळता कुठल्याही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. पुराच्या दहा महिन्यानंतरही नागनदीची संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही.
-तर क्रेझी कॅसलच्या भागातील पात्राचे रुंदीकरणही करण्यात आलेले नाही. तसेच इतर अनेक कामे अर्धवट असून पुन्हा एकदा अंबाझरी तलावाची पातळी वाढली. मुसळधार पाऊस झाल्यास तलाव ओव्हरफ्लो होऊन पुराचा धोका निर्माण झाला आहे.
-पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने आता नागरिकांकडूनच खबरदारी घेण्यात येत आहे. दोन मजल्यांचे घर असलेल्यांकडून महत्त्वाचे साहित्य व वस्तू वरच्या माळ्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
-अनेकांनी वरच्या मजल्यावरच नियमितपणे राहणे सुरू केले आहे, अशी माहिती या भागातील रहिवासी गजानन देशपांडे यांनी दिली. या भागात दोनमजली घरे असलेल्यांकडून उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी काही घरांमध्ये अशी कुठलीही व्यवस्था नाही.
-त्यांच्याकडून दोनमजली घर असलेल्या शेजाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे किंवा नातेवाईक व मित्र मंडळींकडे निवासाच्या व्यवस्थेचा प्रयत्न सुरू आहे.
-काही घरांमध्ये प्रकृती अस्वास्थामुळे ज्येष्ठ नागरिकांना हलविणे शक्य नसल्याने अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. अंबाझरी तलावाजवळील पुलाचे काम सुरू असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी जागा निमुळती झाली आहे.
-तर हायड्रोलिक पंपांची मदत
तलावाची वाढती पातळी बघता ओव्हरफ्लो रोखण्यासाठी महापालिकेकडून याठिकाणी हायड्रोलिक पंप तैनात करण्याचा विचार सुरू आहे. सध्या दररोज तलावातून दोन लाख लिटर पाणी काढण्यात येत आहे. मात्र, गरज भासल्यास हायड्रोलिक पंपाच्या माध्यमातून पाणी काढण्यात येईल. जेणेकरून, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात निर्माण झालेली परिस्थिती उद्भवणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.