Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
World Tiger Day : व्याघ्रमृत्यूत महाराष्ट्र दुसरे; मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू, चिंताजनक आकडेवारी समोर
संपूर्ण देशभरात २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार देशात ३,१६७ वाघांची नोंद झाली. याच्या दुसऱ्या वर्षी; २०२३मध्ये आजवरचे सर्वाधिक १७८ वाघ गमावले. महाराष्ट्रात सर्वाधिक ५१, मध्य प्रदेशात ४०; तर कर्नाटक, केरळ व तमिळनाडूत प्रत्येकी १४ वाघांचा मृत्यू झाला होता. वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरीत्या हे मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात चालू वर्षाच्या सुमारे सात महिन्यांत तब्बल २६, महाराष्ट्र १६ तर कर्नाटकमध्ये ११ वाघांचा मृत्यू झाला आहे.
शिकाऱ्यांनी वाढवली चिंता
चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या मूल उपक्षेत्रातील चिरोली नियतक्षेत्रांतर्गत नलेश्वर येथे वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उघडकीस आले होते. जिवंत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून या वाघाचा मृत्यू झाला होता. तीन दिवस कुऱ्हाडीच्या साह्याने तुकडे करून या वाघाचे अवयव जाळण्यात आले होते. वाघांच्या मृत्यूमध्ये शिकार हा घटकही चिंता वाढविणार ठरत आहे. काही प्रकरणांची चौकशी केली जात आहे.
विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू
राज्यात २०१८ ते मे २०२४ या कालावधीत विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात मे महिन्यापर्यंत नैसर्गिकरीत्या आठ, अपघाती दोन, विद्युत प्रवाहामुळे एक मृत्यू झाला असून, पाच वाघांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. ही एकूण संख्या १६ इतकी आहे. वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्ष सुरू केले आहेत. या कक्षाला बळकट करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अलीकडेच केली. याशिवाय मेळघाट व्याघ्रप्रकल्पात तयार केलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकाऱ्यांचा शोध घेणार असल्याचेही नमूद केले.
रस्ता- रेल्वे अपघातात मृत्यू वाढले
रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहनांचा वाढता वेग, स्पीड ब्रेकर नसणे यातून हे अपघात होतात. दर वर्षीची आकडेवारीही वन विभागाकडे आहे; पण तपासाअंती यातील वाहन सापडत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. रेल्वेच्या धडकेतही वाघांसह वन्यप्राणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या असल्याने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
वर्ष——-देशातील वाघांचे मृत्यू
२०१९ : ९६
२०२० : १०६
२०२१ : १२७
२०२२ : १२१
२०२३ : १७८
२०२४ ते आतापर्यंत : ८१
एकूण : ७०९
सरकारने इकडे लक्ष द्यावे!
– वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी अनुदानावर सौर ऊर्जा पुरविणे.
– अधिक संख्या झाल्यास वाघांचे स्थानांतरण करणे.
– वन विभागाने काही वनपरिक्षेत्रांसाठी कृती आराखडा तयार करावा.
– स्थानांतरण शक्य नसल्याने अधिक वाघ असलेला भाग अभयारण्य घोषित करावा.
– वनाचे शाश्वत जतन करून लोकांचे वनांवरील अवलंबन कमी करणे.
– वन्यजीवांचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी रस्ते बांधताना विचार व्हावा.