Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai News: महामार्गांवर पूर्णपणे होर्डिंग बंदी; मुंबई महापालिकेकडून नवे धोरण लवकरच

8

मुंबई : घाटकोपर येथे महाकाय जाहिरात फलक कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेकडून नव्याने जाहिरात फलक संदर्भात धोरण बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डिजिटलसह सर्व प्रकारच्या जाहिरात फलकासाठी धोरण बनवताना त्यामध्ये काही नवीन नियमही लागू होणार आहेत. यामध्ये मुंबईतील महामार्गांवरही पूर्णपणे होर्डिंग बंदी येणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने २०१६च्या निर्देशांची अंमलबजावणी महापालिका करणार आहे. धोरण येण्याआधीच महापालिकेने रस्ते मंत्रालयाच्या निर्देशानुसार महामार्गांवरील २६ होर्डिंगही काढले आहेत.घाटकोपर छेडानगर येथे १३ मे, २०२४ रोजी जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये १७ जणांचा मृत्यू आणि ८० जण जखमी झाले होते. लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या या घटनेच्या अनुषंगाने मध्य आणि पश्चिम रेल्वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजे ४० बाय ४० फूटपेक्षा अधिक आकाराच्या जाहिरात फलकांवरून वाद सुरू झाला. त्यामुळे महापालिकेने रखडलेल्या नवीन फलक धोरणाला गती देतानाच स्वतंत्रपणे डिजिटल जाहिरात फलक धोरणही आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण २००८मध्ये लागू झाले होते. त्यात आजवर सुधारणा झालेली नाही.

न्यायालयानेही महापालिकेला नवीन धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने २०१७मध्ये नवीन धोरण तयार करण्याची तयारी सुरू केली होती. धोरण राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते, राज्य सरकारने काही बदल करावयास सांगून ते पुन्हा महापालिकेकडे पाठवले. करोनाकाळात ही प्रक्रिया रखडली. आता सर्व प्रकारच्या फलकांसाठी धोरण तयार केले जात असून काही अटी, निर्बंध लागू केले जाणार आहेत.

केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडूनही मुंबई महापालिकेला २०१६मध्ये पत्र आले होते. तसेच घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्य सरकारनेही केंद्राच्या नियमाची आठवण करून देत महामार्गांवर दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे फलक नको, जेणेकरून पुन्हा मोठ्या दुर्घटनेला सामोर जावे लागेल. या फलकामुळे वाहनचालकांचे लक्षही विचलित होऊन अपघाताचा धोका होऊ शकतो, असे स्पष्ट केले होते.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
सध्या मुंबईतील पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्गाबरोबरच फ्री-वेच्या दोन्ही बाजूला होर्डिंग्ज आहेत. या महामार्गांवर कोणत्याही प्रकारचे फलक लागू नये, यासाठी मुंबई महापालिका नव्या धोरणामार्फत अंमलबजावणी करणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या मुंबईतील महामार्गांवर विविध प्रकारे फलक लावण्यात येत असून ते काढण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

नियमबाह्य २६ फलक काढले

मुंबईतील महामार्गांसह अन्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५०पेक्षा अधिक फलक असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहेत. यामध्ये काही मोठ्या फलकांनी पदपथही व्यापले आहेत. ‘एमएमआरडीए’सह अन्य सरकारी यंत्रणांच्या अखत्यारीतील हे फलक मुंबई महापालिकेची परवानगी न घेताच लावलेले होते. मुंबई महापालिकेने असे २६पेक्षा अधिक फलक काढले आहेत. रस्ते मंत्रालयाच्या पत्रानुसार महामार्गांवरही कारवाई केली आहे. मात्र नवीन धोरणात याचा समावेश केल्यास या कारवाईत अधिक त्वरित केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.