Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवी मुंबई शहरात दिघा ते बेलापूरदरम्यान अनेक रिक्षा परमिट नसतानाही धावत आहेत. प्रवाशांशी उर्मट वर्तन करतानाच रिक्षा थांब्यांवर रांग सोडून प्रवासी येत असलेल्या मार्गावरून प्रवासी मिळवण्याचे प्रकारही त्यांच्याकडून केले जातात. त्यामुळे प्रामाणिकपणे रांगा लावून प्रवासांची वाट बघणाऱ्या असलेल्या रिक्षाचालकांना नुकसान सहन करावे लागते. या रिक्षाचालकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांना रिक्षा चालविणे अवघड होऊन बसल्याची तक्रार रिक्षाचालकांनी केली आहे. या विनापरवाना रिक्षांची अवस्था अत्यंत बिकट असते. रस्त्यावर धावण्याची रिक्षांची क्षमता नसतानाही त्यात प्रवाशांना बसवले जाते. त्यामुळे या रिक्षांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिविताला धोका आहे, याकडेही रिक्षाचलाकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे नवी मुंबईत धावणाऱ्या रिक्षांचा दर्जा तपासावा, अशी मागणी रिक्षाचालक आणि प्रवाशांनी केली आहे.
प्रवाशांनी रिक्षाचालकांची तक्रार केली तरी त्यांच्याकडे परवाने नसल्याने तसेच, रिक्षाक्रमांक बोगस असल्याने हे रिक्षाचालक वाहतूक विभाग, परिवहन विभागाच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे ते प्रवाशांशी सर्रास उर्मट वर्तन करतात. प्रवासीभाडे नाकारणे, उद्धट वर्तन करणे, हाफ रिटर्नची मागणी करणे, भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी करणे, जवळचे भाडे नाकारणे, पूर्व भागातून पश्चिम भागात भाडे घेऊन जाण्यास नकार देणे, अन्यथा दुप्पट भाड्याची मागणी करणे असे प्रकार सर्रास केले जातात. त्यामुळे नवी मुंबईतील दिघा ते बेलापूरदरम्यान रिक्षा तपासणी अभियान राबवून यावर तोडगा काढून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कामगार नेते रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अनेक ठिकाणी अल्पवयीन चालक
अनेक ठिकाणी अल्पवयीन रिक्षाचालक रिक्षा चालवताना दिसू लागले आहेत. हे रिक्षाचालक सर्रास मोबाइलवर बोलत असतात किंवा मोबाइलवर रिल्स बघून रिक्षा चालवत असतात. त्यांना तसे न करण्यास सांगितले असता, तुम्हाला काही झाले तर नाही ना, असे उर्मटपणे बोलून हुज्जत घालतात, अशी तक्रार रिक्षाप्रवासी करत आहेत.
सदस्य होण्यासाठी संघटनेचा दबाव?
नवी मुंबईतील रिक्षा थांब्यावर सदस्य नसलेल्या अन्य रिक्षा व्यवसायासाठी उभ्या राहिल्यास त्यांना तिथे उभे राहण्यास मज्जाव केला जातो. त्यांना स्टँडची पावती तसेच, संघटनेची पावती फाडण्यास सांगितले जाते, अशा तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. बाहेरून आलेली रिक्षा थोड्या वेळाकरिता व्यवसायासाठी स्टँडवर येते, रांगेत उभे राहिल्यावर ग्राहक घेऊन ते त्यांच्या परिसरात निघून जातात, अशावेळी त्यांना पावतीसाठी संघटनेचा सदस्य होण्यासाठी दबाव आणणे योग्य नाही, अशी भूमिकाही रिक्षासंघटनेने मांडली.