Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. त्यानुसार येत्या काळात नागपूरमध्ये ३६ हजार कोटींच्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये २७ हजार कोटींच्या, रायगडमध्ये आठ हजार कोटींच्या, तर रत्नागिरीत दीड हजार कोटीच्या प्रकल्पांची उभारणी होणार आहे. या प्रकल्पांमुळे हजारो नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. मात्र, या घोषणेत नाशिकचा समावेश नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा नाशिकला ठेंगा दाखवल्याची उद्योजकांची भावना आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नाशिकला येऊन मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासने दिली होती. उद्योगमंत्र्यांनीही उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या निराकरणाची ग्वाही दिली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा नाशिकला डावलण्यात आले असून, नागपूर, रत्नागिरी, रायगड या उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यांतच गुंतवणूक देण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या नाशिकला कोणी वाली नसल्याने जिल्ह्याची फरपट होत असल्याची भावना औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
नेत्यांनी राजकीय स्वार्थ साधत पुन्हा आपापल्या भागाकडे प्रकल्प नेले आहेत व नाशिकला नेहमीप्रमाणे ठेंगा दाखवला आहे. अंबड एमआयडीसीला १६ हेक्टर जमीन देणे ही धूळफेक होती, हे आता लक्षात येत आहे. तरी आम्ही प्रयत्न करीत राहू.– ललित बूब, अध्यक्ष, आयमा
गुंतवणुकीचे करार होत असताना आपण शासनाला मागण्या कळवल्या होत्या. आता यासंदर्भातील सर्व बाबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत आहोत. लवकरच मुख्यमंत्र्यांसह संबंधितांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊ.- आशिष नहार, सचिव, इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी नाशिकमध्ये गुंतवणूक आणण्याचे आश्वासन दिले होते; पण नाशिकला काहीही मिळाले नाही. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांची पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भेट घेणार आहोत.- धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा
कुशल मनुष्यबळ, चौदाहून अधिक इंजिनीअरिंग महाविद्यालये, नऊहून अधिक व्यवस्थापन शिक्षणकेंद्रे, मुबलक पाणी, वीज, रस्ते, विमानसेवा असूनही नाशिकला डावलणे चुकीचे आहे. नाशिकच्या बेरोजगार तरुणांना किती दिवस मुंबई-पुण्यात जाऊन नोकरी करावी लागणार, हा प्रश्नच आहे.– संजय सोनवणे, शाखा अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स