Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
माणूस म्हणून जगायचे असेल तर ताठ मानेने जगा, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करून वेश बदलायचा म्हणजेच तुम्ही स्वत:ला बदलत आहात. अजित पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला बहुरुपी मिळाला. त्यांना कधीही चित्रपटाची वगैरे ऑफर येऊ शकते, अशा उपरोधिक शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री
जर वेशांतर करायचे तर निधड्या छातीने करायचे ना… मी कुणाला घाबरत नाही, जे करतो ते समोर करतो… असे अजितदादांच्या आवाजात मिमिक्री करून लपून छपून कशाला असले प्रकार करायचे? असा सवाल आव्हाड यांनी विचारला. टोपी, गॉगल, हुडी घालून अजितदादांनी त्यांची चालही बदलली. सत्ता माणसाला काय काय करायला लावते. बरं एवढं करूनही उपमुख्यमंत्रीच झाले, अशा शब्दात त्यांनी दादांची खिल्लीही उडवली.
महाराष्ट्राला एक फसवणारा उपमुख्यमंत्री मिळाला
महाराष्ट्राला एक चांगला बहुरुपी मिळाला. त्या ही पेक्षा महाराष्ट्राला एक फसवणारा उपमुख्यमंत्री मिळाला. वेशांतर प्रकरणाच्या बातम्या छापून आणा, असे अजित पवार पत्रकारांना सांगत होते. एवढीच बातमीची हौस असेल तर जीएसटी बैठकीत अनुपस्थित राहिलो पण मी त्याची भरपाई करून महाराष्ट्राच्या वाट्याचा निधी आणीन, असे सांगणारी बातमी छापायला लावा, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
उद्यापासून मला ‘जे सतीश ए’ म्हणा
लोकशाहीत आणि कायद्यात आपल्या नावाने तिकीट नसणे हे किती गंभीर आहे. त्यांनी ए अनंतराव पी या नावाने प्रवास केल्याचे सांगितले. आज ते प्रवास करताहेत उद्या एखादा अतिरेकीही असाच प्रवास करेन, अशी भीती व्यक्त करत यातील दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. त्याचवेळी उद्यापासून मला ‘जे सतीश ए’ अशा नावानेच हाक मारायची, अशी कोपरखळीही मारली.
नेमके प्रकरण काय, अजितदादांवर टीका का होतेय?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी वेशांतर करून मुंबई ते दिल्ली रात्रीचा विमानप्रवास केल्याची माहिती दस्तुरखुद्द त्यांनीच पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना दिली. अमित शाह यांना भेटण्यासाठी रात्री दीड वाजता मुंबईतून निघून पहाटे पाचपर्यंत पुन्हा मुंबईत यायचो. पण लोक ओळखतील म्हणून मला वेशांतर करावे लागायचे. त्यासाठी डोक्यात टोपी, डोळ्यावर गॉगल घालून जावे लागत, असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.