Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजपशी संबंधित सकल हिंदू समाजाकडून ४ ऑगस्टला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. २०२२ मध्ये राज्यात पहिल्यांदा हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले होते. त्यावेळी हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी घालून हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या वर्षी राज्यात असे २४ हून अधिक मोर्चे निघाले. विश्व हिंदू परिषद आणि सनातन संस्था या हिंदुत्त्ववादी संघटनांनी त्यांचं आयोजन केलं होतं.
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपचे नेते लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फशी संबंधित विषय अधिक आक्रमकपणे लावून धरु लागले आहेत. या माध्यमातून हिंदुत्त्ववादी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता राज्यात पुन्हा एकदा जन आक्रोश मोर्चे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पहिला मोर्चा सोलापूरच्या करमाळ्यात ४ ऑगस्टला, तर दुसरा मोर्चा १४ ऑगस्टला अमरावतीत काढला जाईल. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवर लोकसभेला भाजपचा पराभव झाला आहे.
काही अंतर्गत विषयांमुळे थांबलेले मोर्चे आम्ही पुन्हा सुरु करत आहोत. त्याची सुरुवात पुढील आठवड्यापासून होईल, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणेंनी दिली. मोर्चांमध्ये समन्वय राखण्याचं काम भाजपनं आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांना दिलं आहे. या मोर्चांचं नेतृत्त्व कोणताही नेता, पक्ष किंवा संघटना करणार नाही. आपल्या धर्मासाठी लढायला हवं अशी इच्छा असणारे हिंदू या मोर्चात उतरतील. जिथे जिथे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फशी संबंधित घटना घडतील, तिथे तिथे आम्ही स्थानिक हिंदुत्त्ववादी संघटनांच्या मदतीनं मोर्चे काढू, असं ते म्हणाले.
आमदार राणे आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये अधिक सक्रिय दिसून येतात. उरणमध्ये २० वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर दाऊद शेखनं हत्या केल्यानंतर भाजप नेत्यांनी तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. पण नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लव्ह जिहाद नसल्याचं म्हटलं आहे.
कोल्हापूरच्या विशाळगड किल्ल्यावर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठीही हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर १५ जुलैला प्रशासनानं अतिक्रमण हटवलं. यावेळी जमावानं गडाच्या परिसरात असणाऱ्या अल्पसंख्याकांच्या घरांवर, दुकानांवर, वाहनांची तोडफोड केली. मुंबई उच्च न्यायालयानं याची दखल घेत राज्य सरकारची कानउघाडणी केली होती. पाऊस सुरु असताना प्रशासनानं केलेल्या कारवाईबद्दल न्यायालयानं प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. विशेष म्हणजे कोल्हापुरातही लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे.
‘आम्ही अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला. तिथे कोणत्या धर्माचे लोक राहतात त्यावरुन आम्ही भूमिका घेतलेली नाही. आम्ही लव्ह जिहादवरुन मुस्लिमांना लक्ष्य करतोय अशातला भाग नाही. पण प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हिंसाचारात बहुतांश ठिकाणी मुस्लिमांचाच सहभाग असतो. आम्ही काढत असलेल्या मोर्चांमुळे हिंदूंमध्ये जागरुकता निर्माण होतेय,’ असं आमदार राणे म्हणाले.