Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गणेश मंडळांसाठी खुशखबर, पुढील ५ वर्षांसाठी मंडप उभारणीकरिता एकदम परवानगी, शासनाची ‘ही’ नवी स्कीम माहितीय का?
मुंबई महापालिकेकडून ६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जाची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतरच स्थानिक पोलिस ठाणे, व वाहतूक पोलिस ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमानुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारणीची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल. यंदा प्रथमच मुंबई महापालिका गणेशोत्सव मंडळांसाठी सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २०२४च्या उत्सवासाठी अवघे १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन एक खिडकी पद्धतीने अर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मूर्तिकारांकडून ऑनलाइन अर्ज
गणपती मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार आहे. याशिवाय मूर्तीकारांसाठी एक खिडकी योजनाही राबवण्यात आली आहे. आतापर्यंत १ हजार २३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे.
५०० टन मोफत शाडू मातीवाटप
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत शाडू मातीसाठी एकूण २१७ मूर्तिकारांनी मागणी केली असून त्यांना आतापर्यंत ५०० टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे. यामुळे शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती स्थापना करण्याचे प्रमाण यंदा निश्चित वाढेल, असा विश्वास मुंबई महापालिका परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी व्यक्त केला.
समितीची स्थापना
गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी महापालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, के पूर्वचे सहायक आयुक्त मनिष वळंजू, एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्हाळे यांचा समावेश आहे.