Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Swapnil Kusale : स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात होणार ग्रॅंड वेलकम, हत्तीवरुन मिरवणूक, मित्रमंडळींचा प्लॅन ठरला

11

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : तब्बल ७२ वर्षांनंतर तो महाराष्ट्राला पदक मिळवून देणार होता… त्यामुळे सारा गाव त्याच्या घरात टीव्हीसमोर बसून होता… अखेर तो क्षण आला.. स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझपदक जिंकले आणि गावातच नाही, तर जिल्ह्यात जल्लोष सुरू झाला. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा सुरू झाल्या. पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. आपल्या मुलाने राज्याचे, देशाचे स्वप्न साकार केले म्हणून आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.

स्वप्नीलचे गाव कांबळवाडी. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील हे गाव. डोंगरकपारीत वसलेले. त्याचे वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक. आई अनिता या गावाच्या लोकनियुक्त सरपंच. घरची फार मोठी श्रीमंती नसली, तर जिद्द मात्र त्याच्यात नक्की होती. वयाच्या १४ व्या वर्षीच त्याने नेमबाजीच्या सरावासाठी पुणे गाठले. अल्पावधित त्याने आपले कौशल्य सिद्ध् केले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले. यामुळे त्याला रेल्वे खात्यात नोकरीही लागली. क्रीडा प्रबोधिनीत सराव करणारा स्वप्नील एक दोन नव्हे, तर तब्बल १४ वर्षे घरापासून दूर राहून सराव करत आहे. त्याला पदक मिळणार, अशी खात्रीच त्याच्या कुटुंबीयांना होती. त्यामुळे सकाळपासूनच केवळ कुटुंबच नव्हे, तर हजार लोकवस्तीचे आख्ये कांबळवाडी गावच त्यांच्या घरात त्या क्षणाची वाट पाहत होते.

दुपारी स्वप्नीलची लढत सुरू झाली. स्वप्नीलचे वडील, आई, आजी, भाऊ यांच्यासह अनेकजण घरात टीव्हीसमोर बसून होते. सर्वांचीच धाकधूक वाढत होती. हे घर तसे वारकरी संप्रदायातील. आई अध्यात्मिक. यामुळे तिने पंढरीच्या विठ्ठलाचा धावा सुरू ठेवला. सर्वांच्याच नजरा टीव्ही स्क्रीनवर होत्या. प्रत्येक शॉट्सनंतर धाकधूक वाढत होती. अखेर स्वप्नीलने ब्राँझपदक जिंकले आणि घरातील वातारवण एकदम बदलले.

स्वप्नील जिंकताच एकच जल्लोष सुरू झाला. ‘भारत माता की जय,’ च्या घोषणा सुरू झाल्या. कोणाच्याच आनंदाला पारावर उरला नाही. सारेच नाचू लागले. एकमेकांना मिठ्या मारून आनंद व्यक्त करू लागले. अनेक वर्षानंतर सर्वांचेच स्वप्न पूर्ण झाले होते. त्यामुळे काय करू, काय नको अशाच भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाल्या होत्या. प्रत्येकाची छाती अभिमानाने फुगली होती. प्रत्येकाला स्वप्नीलचा अभिमान वाटत होता. यामुळे जो तो जल्लोष करत होता.

Swapnil Kusale : पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील कुसाळेचे मायबाप भावूक
स्वप्नील जिंकणार याची खात्री होती. कारण त्याची इच्छाशक्ती मोठी होती. इच्छाशक्ती आणि मेहनत असेल, तर कोणतेही ध्येय आपण गाठू शकतो, हे आम्ही त्याच्या मनावर ठसवले होते. त्यानुसारच त्याने वाटचाल केली. त्याचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून काल आम्ही त्याला फोनही केला नाही. त्याने देशाला मोठे पदक मिळवून दिले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. – सुरेश कुसाळे, स्वप्नीलचे वडील

टीव्ही पाहताना माझ्या मनात प्रचंड धाकधूक होती. मी तर देवाला हात जोडून प्रार्थना करत होते. अखेर मला विठ्रलच पावला. मुलाने नाव कमवले. त्याची आई असल्याचा मला अभिमान आहे.– अनिता कुसाळे, स्वप्नीलची आई

हत्तीवरून काढणार मिरवणूक

कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या स्वप्नीलचे कोल्हापुरात आल्यानंतर जल्लोषी स्वागत करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि मित्रमंडळीनी घेतला आहे. कोल्हापूर ते कांबळवाडी अशी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच्या या यशाचे खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांनी तोंड भरून कौतुक केले. त्याचे जंगी स्वागत करण्याची घोषणा त्यांनी केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.