Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सावधान… राज्यात डेंगी, चिकुनगुनियाने काढले डोके वर; चिंताजनक आकडेवारी समोर, ‘या’ भागात सर्वाधिक रुग्ण
राज्यात पावसाळा आला, की डेंगी, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांसारखे साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे यंदाही त्याकडे लक्ष ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिला आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
शहरी भागात डेंगी सर्वाधिक
राज्यात गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभरात १९ हजार ३४ रुग्ण आढळले. त्यापैकी ५५ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी जुलैअखेर ३,१६४ जणांना डेंगीची बाधा झाली. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. या वर्षी डेंगीची रुग्णसंख्या वाढून, ५,७७९ रुग्ण आढळले. त्यापैकी चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. चिकनगुनियाचे गेल्या वर्षी १,७२३ रुग्ण आढळले होते. या वर्षी १,१८९ रुग्ण आढळले आहेत. राज्यात पुणे, मुंबई, नाशिक आणि ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांत डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले.
हिवतापाच्या रुग्णांत वाढ
राज्यात गेल्या वर्षी हिवतापाचे १६ हजार १५९ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी जुलैअखेर ६,३५७ रुग्ण आढळल्याने त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. यंदा जुलैअखेर हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. जुलैअखेर नऊ हजार रुग्ण आढळले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार रुग्णांची भर पडली; सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कीटकजन्य आजार वाढण्याची कारणे
– एप्रिलपासून राज्यात सर्वेक्षणात वाढ.
– संशयितांच्या चाचण्यांवर मोठ्या प्रमाणात भर.
– अधूनमधून झालेल्या पावसामुळे पाण्याचे तळे साचून डास निर्मितीस पोषक स्थिती.
– सर्वेक्षणामुळे रुग्ण वाढले; पण मृत्यू कमी.
– पुणे, मुंबई, नाशिक, ठाण्यात सर्वाधिक डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण.
राज्यातील डेंगीच्या पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
सर्वाधिक धोक्याचे जिल्हे रुग्णसंख्या
कोल्हापूर ३७६
पालघर २९४
रायगड २१८
रत्नागिरी २०३
नागपूर १४८
चंद्रपूर १४७
सातारा १४५
नाशिक ११९
पुणे १०८
आरोग्य विभाग ‘अॅलर्ट’वर
पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे कीटकजन्य आजाराच्या साथींचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाची गुरुवारी तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीत आरोग्य विभागाला अॅलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हानिहाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना याबाबत सूचना करण्याचा आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग ‘अॅलर्ट मोड’वर आला आहे. राज्यात एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे रुग्ण पाठविण्यात (रेफर) आलेल्या रुग्णांच्या पडताळणीसाठी समिती स्थापन करण्यात यावी, अशीही सूचना डॉ. सावंत यांनी केली.