Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Axiom 4 Mission: चार दशकांनंतर भारतीय झेपावणार अवकाशात; ग्रुप कॅप्टन शुक्ला, नायर यांची ॲक्सिऑम ४ मोहिमेसाठी निवड

8

पुणे : भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) जाणाऱ्या ‘ॲक्सिऑम ४’ या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड झाली आहे. या मोहिमेत शुक्ला यांच्याकडे कॅप्टनची जबाबदारी असून, नायर हे राखीव कॅप्टन म्हणून मोहिमेत सहभागी असतील. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल चार दशकांनी भारताचे नागरिकत्व असणारी व्यक्ती शुक्ला यांच्या रूपाने अवकाशात झेपावणार आहे. या दोघांनाही ‘गगनयात्री’ असे संबोधण्यात आले आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) शुक्रवारी याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान इस्रो आणि अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) संयुक्त अवकाश मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. त्याला अनुसरून नासाशी व्यवसायिकरित्या संलग्न असलेल्या ॲक्सिऑम स्पेस या कंपनीसोबत इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरने (एचएसएफसी) ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेसाठी अवकाश प्रवासाचा करार केला.

भारताच्या ‘नॅशनल मिशन असाइनमेंट बोर्डा’ने या मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची प्रमुख कॅप्टन म्हणून निवड केली असून, राखीव कॅप्टन म्हणून ग्रुप कॅप्टन नायर यांचा सहभाग असेल. आयएसएसमध्ये सहभागी असलेल्या देशांच्या मल्टीलॅटरल क्रू ऑपरेशन्स पॅनलकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर भारतीय गगनयात्री मोहिमेत सहभागी होऊ शकतील.

India’s Mars Moon Station: मंगळ आणि चंद्रासारखी आहे भारतातील ‘हि’ जागा; शास्त्रज्ञ करताय येथे संशोधन, जाणून घ्या सविस्तर
या मोहिमेत शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेच्या पेगी व्हिट्सन या कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळतील. पोलंडचे स्लॅवोझ ऊझान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभाग असेल. चौघा अंतराळवीरांचे प्रशिक्षण येत्या ५ ऑगस्टपासून अमेरिकेत सुरू होणार असून, त्यांना नासा, स्पेस एक्स आणि ॲक्सिऑम स्पेसच्या विविध केंद्रांवर अवकाशयान, मोहिमेशी संबंधित यंत्रणा आणि आयएसएसवर करण्यात येणाऱ्या प्रयोगांचे प्रशिक्षण देण्यात येईल.
India’s First Phone Call: 29 वर्षांपूर्वी ‘या’ व्यक्तीने केला होता भारतात पहिला फोन; जाणून घ्या त्याने कोणाचा नंबर केला होता डायल
अशी असेल ‘अक्सिऑम ४’ मोहीम

‘ॲक्सिऑम ४’ ही मोहीम चालू वर्षाअखेरपासून ते २०२५मध्ये राबवण्यात येऊ शकते. स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन नऊ रॉकेटच्या साह्याने क्रू ड्रॅगन अवकाशयानामार्फत ही मोहीम पार पडेल. या मोहिमेतून भारतीय गगनयात्रींना गगनयान मोहिमेआधीच अवकाश प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. १४ दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार असून, तंत्रज्ञानांची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.