Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणेकरांनो सावधान! पावसाचा रेड अलर्ट, खडकवालातून विसर्ग वाढवणार

11

म. टा. प्रतिनिधी, पुणे: खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशी धरणातूनही मुळा नदीपात्रात २७ हजार ६०९ क्युसेक्स आणि पवना धरणातून पाच हजार क्यूकेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या नागरिकांना ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे. रात्रीतून धरणातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली.

धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या; तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टीच्या ‘रेड अॅलर्ट’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आवश्यकता भासल्यास ‘एनडीआरएफ’ची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

विसर्ग वाढण्याची शक्यता

धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजीनगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरिस ब्रिज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपिटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी, एकतानगरी; तसेच नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी दक्ष रहावे. विशेषत: मुळा-मुठा संगमाजवळील भागात नदीपात्रातील विसर्गाचे प्रमाण जास्त असेल.

नदीपात्राजवळ जाऊ नये

– महानगरपालिकेतर्फे नदीकाठच्या नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

– नदीपात्राजवळ नागरिकांनी जाऊ नये किंवा त्या परिसरात वाहने पार्किंग करू नयेत.

– जिल्ह्यातील इतरही भागांतील धरणे भरली असून, विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

‘सुरक्षित निवारा द्या’

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांच्या पूररेषेलगत; तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी. नागरिकांना मदतीचे सहकार्य करावे, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी, प्रेमनगर येथील सुमारे १०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे; तसेच सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीत दोन सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने १५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.

धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये) टक्केवारी

खडकवासला १.६५ ८३.३१

पानशेत ९.९७ ९३.६७

वरसगाव ११.९० ९२.८२

टेमघर ३.६२ ९७.७४

पवना ७.८३ ९२.०२

कासारसाई ०.५० ८७.३०

कळमोडी १.५१ १००

चासकमान ७.१४ ९४.२९

भामा आसखेड ६.५२ ८४.९७

आंद्रा २.९२ ९९.९९

वडिवळे ०.९८ ९१.५१

भाटघर २३.५१ १००

गुंजवणी ३.२३ ८७.७७

नीरा देवघर ११.१३ ९४.८६

वीर ८.९७ ९५.३४

डिंभे १०.६५ ८५.२६

उजनी ३८.६८ ७२.२०

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.