Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईकरांची ‘लोकल’ प्रतीक्षा कायम, परळ-कुर्ला दरम्यानची पाचव्या-सहावी मार्गिका ३ वर्षांनंतर, मध्य रेल्वेची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्लादरम्यान पाचवी-सहावी मार्गिका हा जागेच्या अनुपलब्धतेमुळे शहरातील सर्वाधिक काळ रखडलेला प्रकल्प आहे. सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते कल्याणदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका कार्यरत आहे. सीएसएमटी ते कुर्लादरम्यान चारच मार्गिका असल्याने जलद लोकलच्या मार्गावरून मेल-एक्स्प्रेसची हाताळणी केली जाते. या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार झाल्यावर अतिरिक्त लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
परळ ते कुर्लादरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. या कालावधीत रुळांलगतच्या खासगी आणि सरकारी जमिनीचे संपादन आणि प्रकल्पबाधित प्रवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सांगितले.
राष्ट्रीय टेक्स्टाइल कॉर्पोरेशनच्या (एनटीसी) ताब्यातील दोन हजार ५६५ चौरस मीटर जमिनीचे संपादन सप्टेंबर २०२२मध्ये करण्यात आले आहे. महापालिकेच्या ताब्यातील एक हजार चौ. मी. जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यांचे पुनर्वसन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर टाटा पॉवरच्या मालकीच्या १०६ चौ. मी. जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्वदेशी मिलच्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाने २०२२मध्ये चार हजार ३९१ चौरस मीटर खासगी जमिनीचे संयुक्त मोजमाप करण्याची परवानगी दिली आहे. मात्र प्रकल्पबाधितांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सर्व्हेक्षणास नकार दिला आहे. यामुळे सध्या मोजमाप प्रक्रिया रखडली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शीव रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यावर सर्वप्रथम रस्त्यांवरील डांबर उखडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर पुलावरील गर्डरचे तुकडे करून हटवण्यात येणार आहेत. यासाठी मोठ्या ब्लॉकची आवश्यकता आहे. ब्लॉकवेळेत कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द राहण्यासाठी रात्रकालीन ब्लॉकचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, नव्या मार्गिका सेवेत येण्यापूर्वी शीव रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नव्या मार्गाला प्राधान्य हवे!
सन २००८ रोजी मंजूर झालेल्या नवीन मार्गिकांच्या प्रकल्पाचे काम सन २०२४मध्येही पूर्ण होऊ शकले नाही. शीव पूल वाहतुकीसाठी बंद केल्यावर परळ ते कुर्ल्यादरम्यान मार्गिका उभारण्याचा प्रमुख अडथळा दूर होणार असला तरी रेल्वे प्रशासनाने भूसंपादनासाठी मुंबई महापालिका आणि ‘एमएमआरडीए’ या यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यंत्रणांनी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करून सहकार्य करणे आवश्यक आहे. मुंबई रेल्वेच्या सर्व प्रकल्पांमध्ये परळ ते कुर्ला प्रकल्पाला प्राधान्य देत नव्या मार्गिका उभारणीचे काम कोणत्याही अडचणी न सांगता पूर्ण करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनांचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.