Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईत संततधार, पुणे-नाशकात धो-धो बरसणार, तर रायगडला पावसाचा रेड अलर्ट, वाचा Weather Report

10

मुंबई: राज्यात शनिवार आणि रविवारी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाने उपस्थिती लावल्यानंतर, सोमवारनंतर पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. आज, सोमवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे आणि सातारा घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईला यलो अलर्ट

मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याती शक्यता आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Pune Rain: लोहगडाच्या पायथ्याला भेगा, आता किल्ले तिकोनावर दरड कोसळली, गावकऱ्यांचा जीव धोक्यात
राज्यात महाबळेश्वरमध्ये रविवारी दिवसभरात १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा, भिरा, शिरवटा, दवाडी या परिसरातही १०० ते १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारसाठी नाशिक, पुणे, सातारा येथील घाट परिसराला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. पालघर, रायगड जिल्ह्यालाही ‘रेड अलर्ट’ देण्यात आला होता. हा अलर्ट सोमवार सकाळपर्यंत आहे. दिवसभरात पालघर केंद्रावर १७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईतही रविवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. मात्र पावसाचा जोर फारसा नव्हता. रविवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत सांताक्रूझ येथे ५.७ मिमी, तर कुलाबा येथे ९.६ मिमी पाऊस नोंदवला गेला. मात्र रविवारी सकाळी ८.३० पर्यंत झालेल्या २४ तासांतील नोंदीनुसार मुंबईत सांताक्रूझ येथे ९६ मिलीमीटर, तर कुलाबा येथे ५७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सांताक्रूझने १०० मिलीमीटरचा टप्पा ओलांडला असून जव्हार, मोखाडा येथे २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यात माथेरान येथे चार दिवसांमध्ये ५०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये माथेरानमध्ये २९३ मिलीमीटर पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातही ठाणे तालुका आणि अंबरनाथ येथे २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस चार दिवसांमध्ये नोंदला गेला. भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर येथे १५० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे.

रायगड, रत्नागिरीत मुसळधारेचा इशारा

या आठवड्यात रायगड जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील पावसाचा जोर सोमवारनंतर कमी होईल. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून पुढे मध्यम सरींची शक्यता आहे.

विदर्भाला ‘यलो अलर्ट’

पुणे जिल्ह्यात पठारी प्रदेशात बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. साताऱ्याच्या घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर घाट भागातील पावसाचा जोरही कमी होईल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवार ते गुरुवार या कालावधीच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पावसाचा जोर फार नसेल. तर विदर्भात मात्र बहुतांश जिल्ह्यामध्ये मंगळवार ते गुरुवार या कालावधीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागात ‘यलो अॅलर्ट’ आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.