Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

98th Marathi Sahitya Sammelan: ९८वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत; ‘अभिजात दर्जा’साठी मदत होण्याची आशा

5

मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने रविवारी केली. इचलकरंजी, मुंबई आणि दिल्लीसह सात संस्थांनी संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. शुक्रवारी दिल्ली आणि शनिवारी मुंबईला दिलेल्या भेटीनंतर रविवारी महामंडळाची यासंदर्भात बैठक झाली. बैठकीनंतर महामंडळाने दिल्लीवर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीर केले.दिल्ली येथे संमेलनाचे आयोजन केल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल, असे मत महामंडळातर्फे व्यक्त करण्यात आले आहे. दिल्ली परिसरातील मराठी भाषक, रसिक, वाचक, लेखकांत संवाद सुरू होण्यासाठीही हे संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी व्यक्त केला.

स्थळ निवड समितीमध्ये प्रा. तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रकाश पागे, गुरय्या स्वामी, प्रदीप दाते, सुनीताराजे पवार, डॉ. रामचंद्र काळुंखे यांचा समावेश होता. दिल्लीमधील स्थळ निवड समितीच्या भेटीनंतर, केंद्रीय पातळीवर काम केलेल्या मराठी निवृत्त अधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दिल्लीबद्दल सकारात्मक चित्र निर्माण झाले होते. यंदाचे संमेलन हे महामंडळ मुंबईकडे असतानाचे अखेरचे संमेलन असल्याने हे संमेलन मुंबईत व्हावे, अशी इच्छा मुंबईकरांकडून व्यक्त होत होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून संमेलनासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसता, अशीही शंका व्यक्त होत होती. त्यामुळे मुंबईला यंदा संधी मिळाली नसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाचा परिसर संमेलन स्थळासाठी निवड समितीला दाखवण्यात आला होता मात्र, संमेलनासाठीची मंडप उभारणी, पाहुण्यांची निवासव्यवस्था याचा विचार करता, दिल्लीपेक्षा मुंबई अधिक खर्चिक ठरली असती. दिल्लीमध्ये तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे या तुलनेत संमेलनासाठी जास्त चांगली सोय होऊ शकते, असे मत निवड समितीतील सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे दिल्लीच्या निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संमेलनस्थळ जाहीर होण्याआधीच दिल्लीतील अनेक मराठी भाषकांनी या संमेलनासाठी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ‘सरहद्द’चे संजय नहार यांनी सांगितले. संमेलनासाठी चार ते पाच हजार साहित्यरसिक येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठीच्या अभिजात दर्जासोबतच दिल्लीतील मराठी अस्मितेसाठीही हे संमेलन महत्त्वाचे ठरेल. निवडणुकांमुळे दुखावली गेलेली मने संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येतील. दिल्लीच्या महाराष्ट्र भवनात सर्व पक्षांचे लोक एकत्र येतात. त्याच पद्धतीने संमेलनातही ही मने सांधली जातील. महाराष्ट्र आणि दिल्ली भावनिक अंतर कमी करण्यासाठी हे संमेलन मदत करेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षांची निवड ऑक्टोबरमध्ये

या आधी १९५४मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकही मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झालेले नाही त्यामुळे शताब्दीच्या उंबरठ्यावरील या साहित्य संमेलनाला वेगळे महत्त्व असेल, असेही सांगण्यात येत आहे. महामंडळ फेब्रुवारी अखेरचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संमेलन आयोजनाचा विचार करीत आहे. महामंडळाची ऑक्टोबरमध्ये पुण्यात बैठक होणार असून त्यात संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.