Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सोमवारी पहाटेच्या सुमारास बदलापूर शहरातील मानकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा या कंपनीत भीषण स्फोट झाले. पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास दोन स्फोट झाल्याने मानकिवलीसह खरवई आणि बदलापूर शहरातील काही परिसर हादरला होता.
या घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. कंपनीतील प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकांविरोधात बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी दिली.
हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीपासून जवळपास ४०० मीटर अंतरावर असलेल्या चाळीमध्ये राहणारे मिस्त्री कुटुंबीयांच्या घरावर रिऍक्टरचा एक पार्ट उडून पडला. तर आजूबाजूच्या जवळपास १० ते १५ घरांचं किरकोळ नुकसान झालं आहे.
या घटनेत मिस्त्री कुटुंबातील घनश्याम मिस्त्री, धनश्री मिस्त्री आणि तीन वर्षाची चिमुकली सिया मिस्त्री गंभीर जखमी झाले आहेत. सध्या धनश्री मिस्त्री आणि घनश्याम मिस्त्री यांच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चिमुकलीवर बदलापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार केले.
यापूर्वी देखील एमआयडीसीत झालेल्या एका कंपनीतील ब्लास्टमुळे गृह संकुलातील सातव्या मजल्यावर एक १०० किलो वजनाचा पार्ट उडाला होता. मात्र त्या घटनेत जीवितहानी झाली नव्हती.
बदलापूर शहरातील केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून या कंपन्या बंद कराव्यात अशी मागणी केली जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या मिस्त्री कुटुंबीयांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता कंपनी मालक त्यांना भरपाई देणार का हे पाहावे लागणार आहे.