Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nashik News: खड्डे दाटे चोहीकडे…शहरात खड्ड्यांचा महापूर; मुसळधारेने नाशिक पालिकेचे पितळ उघड

9

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर दीडशे कोटींचे डांबर ओतल्यानंतरही पहिल्याच मुसळधार पावसात शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्याने ‘श्रावणमासी त्रस्त माणसे, खड्डे दाटे चोहीकडे…’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरभरातील रस्ते खड्ड्यात गेल्याने महापालिकेचे पितळ उघड झाले आहे.

गेल्या महिनाभरापासून संततधारेमुळे रस्तोरस्ती खड्डे पडले असले, तरी शनिवार आणि रविवारच्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यात रस्ते शोधण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. विशेष म्हणजे शहरातील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात ३० कोटींची तरतूद केली जाते. त्यामुळे हा निधी कुठे जातो याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यात डांबराने खड्डे बुजवता येत नसल्याचे सांगत ‘जीएसबी’ने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याचा दावा केला जात आहे.

शहरात जवळपास २३०० किलोमीटरचे रस्ते असून, त्यातील मुख्य रस्त्यांवर दरवर्षी दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचे डांबर ओतले जाते. परंतु, दर पावसाळ्यात या रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाट लागते. त्यातच गेल्या तीन ते चार वर्षांपासून नाशिककरांना महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. पावसाळ्यापूर्वी जवळपास दीडशे कोटींचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला. परंतु, शहरातील चकचकीत आणि चांगल्या रस्त्यांची स्मार्ट सिटी कंपनी आणि एमएनजीएल कंपनीकडून विकासाच्या नावाखाली वाट लावली. १५ मेनंतर शहरातील रस्ते खोदाईला महापालिकेने मनाई केली असतानाही स्मार्ट सिटी कंपनीकडून कामांसाठी भरपावसात रस्ते फोडले जात असल्याने खड्ड्यात रस्ते शोधण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. स्मार्ट सिटीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका मात्र बांधकाम विभागासह शहरातील नागरिकांना बसत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत शहरात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात रस्तेच वाहून गेले आहेत. पावसामुळे शहरातील रस्त्याचे तीनतेरा झाले असून, रस्तोरस्ती मोठे खड्डे पडल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यावर जा, तुम्हाला खड्डेच खड्डे बघायला मिळतील, असे चित्र आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम करून खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात महापालिकेचे पितळ उघड झाल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Chhagan Bhujbal: नाशिकच्या भूसंपादन प्रकरणात भुजबळांचीही उडी; ३ महिन्यांतील प्रकरणांची मागवली माहिती
३० कोटींच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह

महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटींची तरतूद केली जाते. त्यात खड्डे बुजविण्यासाठी डांबर वापरणे, खडी व मुरूम टाकण्याचा समावेश असतो. त्यासाठी दरवर्षी विभागनिहाय ठेकेदार नियुक्त केले जातात. परंतु, पावसाळा सुरू होताच खड्डे बुजविणारे ठेकेदारदेखील गायब होतात. त्यामुळे ३० कोटींच्या खर्चाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ज्या रस्त्यांचे देखभाल दायित्व ठेकेदाराकडे आहे त्यांच्याकडून ते रस्ते दुरुस्त केले जात आहेत. महापालिकेडे असलेले रस्त्यांवरील खड्डेदेखील बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुरूम, ‘जीएसबी’द्वारे खड्डे बुजविले जात आहेत.-संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.