Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नेमकं काय घडलं?
दादर स्थानकातून कोकणात जाणारी तुतारी एक्सप्रेस पकडण्याचा एक तरुण करीत होता. त्याच्याकडे असलेली मोठी ट्रॉली बॅग जड असल्याने त्याला पेलवत नव्हती. या बॅगेखाली पडलेले रक्ताचे थेंब ड्युटीवरील आरपीएफ जवानाच्या निदर्शनास आले. त्याने बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या जय चावडा याला दादर स्थानकातूनच ताब्यात घेतले. तर त्याने दिलेल्या माहितीनुसार पायधुनी पोलिसांनी उल्हासनगर येथून शिवजीत सिंग याला अटक केली. पायधुनी पोलिस या दोघांची कसून चौकशी करीत असून ते देत असलेली माहिती समजावी यासाठी एका शिक्षकाची मदत घेतली जात आहे.
मोबाइल फोनमध्ये चित्रित
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जय चावडा याने सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. जय हा एका खासगी कंपनीत अॅनिमेशनचे काम करतो. रविवारी जय याच्या पायधुनीतील घरामध्ये तो, शिवजीत आणि अर्शद दारू पिण्यासाठी बसले होते. जय हा दारू घेऊन आला त्यावेळी शिवजीत आणि अर्शद यांच्यात जोरदार भांडण सुरू होते. रागाच्या भारत घरातील हातोडा शिवजीतने अर्शदच्या डोक्यात घातला. तो इतक्यावरच थांबला नाही तर घरातील काच फोडून त्याने त्याच्या शरीरावर वार केले. ही सर्व घटना जयने मोबाइल फोनमध्ये चित्रित केली. हे चित्रीकरण करण्यामागील नेमके कारण कोणते, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यानंतर शिवजीतने धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याचे जयने म्हटले आहे. मृतदेह बॅगेत भरून मी पायधुनी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गेलो. तेथून खोपोली लोकल पकडून दादर येथे उतरलो आणि तेथून मेल पकडण्यासाठी ११ क्रमांकाच्या फलाटावर गेल्याचे जय सांगत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिसाच्या मुलाने केली मदत
रविवारी रात्री मृतदेहासह जय याला ताब्यात घेतल्यानंतर नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. मात्र मूकबधिर असल्याने तो नेमके काय सांगतो आहे हे कळत नव्हते. यावेळी या ठिकाणी गस्त घालणाऱ्या एका कॉन्स्टेबलने हा प्रकार पाहिला. त्याने माझा मुलगाही मूकबधिर आहे असे सांगून त्याला घेऊन आला. कॉन्स्टेबलच्या मुलाच्या माध्यमातून पोलिसांनी जय चावडा याच्याकडून जुजबी माहिती मिळवली आणि त्यावरून घटनाक्रम समजला.