Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईत प्लास्टिकबंदी कागदावरच! ७ महिन्यांत १००० किलो प्लास्टिक जप्त, २० लाखांहून अधिक दंड

9

मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लास्टिक हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. पावसाळ्यामध्ये तुंबणाऱ्या पाण्याला कचऱ्यात टाकले जाणारे प्लास्टिक हेच कारणीभूत ठरते. यामुळेच पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबते. या घातक प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची अंमलबजावणी करताना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो. जानेवारीपासून जुलै अखेरीपर्यंत केलेल्या कारवाईतून तब्बल एक हजार किलोंपेक्षा जास्त प्लास्टिक विविध ठिकाणांहून जप्त केले आहे. याशिवाय २० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दंड स्वरूपात वसूल केली आहे. या कारवाईत सर्वाधिक प्लास्टिक मुलुंड, घाटकोपर, सँडहर्स्ट रोड, मशीद रोड, अंधेरी या भागांत आढळले आहे.

मुंबईत २६ जुलै, २००५ रोजी आलेल्या महापुराला नाल्यात साठलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा त्या बाळगणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाईला सुरूवात झाली. करोनाकाळात ही कारवाई थंडावली आणि त्यानंतर महापालिकेने १ जुलै, २०२२पासून बंदी घातलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला पुनरुज्जीवित केले होते. त्यानुसार बाजार, दुकाने आणि आस्थापना, परवाना विभागाचे प्रभागनिहाय पथक दुकानांना भेट देतानाच बंदी असलेले प्लास्टिक जप्त करू लागले. दुकानदाराने बंदी असलेले प्लास्टिक वापरल्यास दंड वसूल करून त्यानंतर जप्त केलेले प्लास्टिक महापालिका प्रभागांतील गोदामात ठेवू लागले. ही कारवाई सातत्याने सुरू असली तरीही प्लास्टिक वापराला पूर्णपणे आळा बसलेला नाही.

महापालिकेने १ जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत प्लास्टिक विरोधी कारवाईत १ हजार ६६ किलो प्लास्टिक जप्त केले. ४०६ जणांविरोधात ही कारवाई करताना २० लाख ६० हजार रुपये दंड वसूल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १९ हजार ४१३ ठिकाणी भेटी दिल्यानंतर अवघ्या ४०६ केसेस दाखल झाल्याचे समोर आले आहे. एकट्या जुलै महिन्यात ६१२ किलोचे प्लास्टिक जप्त केले आहे. या महिन्यात १३ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुनर्प्रक्रिया कागदावरच


मुंबईत आढळणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिकच असते. यामध्ये भाजी, फळांसाठी वापरण्यात येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पाकिटांची आवरणे यांचा समावेश असतो. त्यापाठोपाठ कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक बाटल्याही आढळतात. हॉटेल, खाद्यपदार्थ स्टॉल्ससह अन्य दुकानांतून प्लास्टिक बाटलीबंद पाणी विकत घेतले जाते आणि त्याचा वापर झाला की ते कचऱ्यात टाकण्यात येते. बाटल्या आणि थाळ्या, ग्लास, चमचे, पिशव्या, वाट्या, कंटेनर, स्ट्रॉ, कप या प्लास्टिकचाही वाढता वापर हा पर्यावरण आणि आरोग्यालाही घातकच आहे. त्यामुळे या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू बनवण्याचा विचार महापालिका गेल्या काही वर्षांपासून करत आहे. प्लास्टिक कचरा हा मुंबईकरांकडून जमा करण्याचा निर्णय घेताना त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर २४ पैकी पाच प्रभागांमध्ये पाच केंद्रे स्थापन केले जाणार होती. ही केंद्रे स्थापन झाली की नाही, याबाबत महापालिकेनेही काहीही माहिती दिलेली नाही.
Mumbai News: तबेले होणार हद्दपार! पालघरमधील दापचेरी येथे स्थलांतर करण्यासाठी BMCच्या हालचाली
नेमका कसला कचरा?

मुंबईत सध्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ४८ केंद्रे कार्यरत आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून ते विलगीकरण करतात. मुंबईत दररोज सहा हजार ते सात हजार मेट्रीक टन कचरा आढळतो. ओला, सुका कचरा असे विलगीकरण करताना सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक बाटल्या, वर्तमानपत्र, मिक्स पेपर, बॉक्स, पुठ्ठा, कार्डबोर्ड, थर्माकोल, काचेच्या बाटल्या, कपडे, ई-कचरा इत्यादींचा समावेश असतो.

सर्वाधिक प्लास्टिक पुढील प्रभागांत…

मुलुंड टी प्रभाग- १०६ किलो
घाटकोपर एन प्रभाग- ७६.४५ किलो
अंधेरी पश्चिम के पश्चिम प्रभाग- ४० किलो
सँडहर्स्ट रोड आणि मशीद रोड परिसर बी प्रभाग- ४४ किलो
एफ दक्षिण प्रभाग, परळ- २३ किलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.