Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शरद पवार काय चमत्कार करू शकतात, हे आपण मागच्या लोकसभा निवडणुकीत पाहिले. अनेक जण इथे आले, विविध वल्गना केल्या पण इथल्या लोकांनी पवार साहेबांना साथ दिली. मराठी माणसाला गद्दारी आणि फसवेगिरीबाब प्रचंड राग आहे. जो फसवतो त्याच्या विरोधात मराठी माणसं उभी राहिली आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रा कशासाठी? जयंत पाटलांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झालेली आजची यात्रा ही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधी आहे. दलबदलू लोकांच्या विरोधी आहे, महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवणाऱ्यांचे विरोधी आहे. आज सामान्य माणसांच्या मनात विष कालवण्याचे काम केले जात आहे, जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम केले जात आहे. सत्तेत बसून ज्यांनी हे काम केले त्या सगळ्यांचे विरोधी आमची ही यात्रा आहे असे त्यांनी सांगितले.
पैशाला महाराष्ट्र नमला नाही, झुकला नाही
आपल्या सर्वांसाठी पुढचा काळ हा सत्ता संपत्तीच्या विरोधी लढण्याचा काळ आहे. लोकसभेत निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला गेला. लोकसभेची निवडणूक यांनी नगरपालिकेची निवडणूक केली, अशी यांची राजकारणाची नीती आहे. पण पैशाला महाराष्ट्र नमला नाही, झुकला नाही उलट त्यांच्या विरोधात जाऊन जनतेने ३१ जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या, असे जयंत पाटील म्हणाले.
मागासवर्गीय आणि आदिवासी बांधवांचा हक्क मारू नका
आज सरकारची लाडकी बहिण योजना सुरू आहे. तुम्ही अर्ज भरा, काय असेल ते लाभ घ्या कारण खिशातून कोणी देत नाही आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे. प्रत्येकाला त्याचा वाटा त्यात मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे कमी करून काही वाटू नये, सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे पैसे कमी करून काही वाटू नये. सरकारने आदिवासी विभागाचे पैसे मागच्या वर्षी कमी केले, मागच्या वर्षी तुम्ही मागासवर्गीय समाजाचे डिपार्टमेंटला दिलेले पैसे कमी केले आता या वर्षी पण तुमची नीती हीच आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. फक्त एकाच योजनेवर लक्ष केंद्रित केले जात आहे असा आरोप त्यांनी केला.
केंद्रातील सरकार किती काळ टिकणार याबाबत शंका
लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने अभूतपूर्व निकाल दिला. ४०० पारच्या घोषणा करणाऱ्यांना ३०० च्या आत थांबावे लागले. त्यामुळे मोदी सरकार न येता एनडीए सरकार आले. तेही कसे आले तर नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाचा टेकू घेऊन. या दोघांचाही इतिहास जनतेला चांगला माहिती आहे म्हणून हे सरकार किती काळ टीकणार याबाबत शंका आहे, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, महाराष्ट्रद्रोहाला जनता उत्तर देईल
नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात टेकू देणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्याला भरभरून दिले पण महाराष्ट्राला काहीच दिले नाही. आपल्या तरुणांना काही प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार मिळणार होता पण ते प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवले हा महाराष्ट्राद्रोह आहे. या महाराष्ट्रद्रोहाला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल.
कांदा गेल्यानंतर माफी कसली मागता?
आज कांद्याचा प्रश्न गंभीर आहे, सरकारने कधी निर्यातबंदी लावली तर कधी निर्यातीवर शुल्क लावला. आज नाशिकमध्ये जावून काही लोक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागत आहे. कांदा सगळा गेल्यानंतर माफी कसली मागता? यांच्यातील एकानेही दिल्लीला जाब विचारण्याची धमक दाखवली नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ७० टक्के आमदार नवे चेहरे असतील
इकडे येऊन लढायला मर्दाचे काळीज लागते. आम्ही लढणार आणि जिंकणारही आणि सरकारही महाविकास आघाडीचेच येणार. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ७०% आमदार नवे चेहरे असतील, असे जयंत पाटील म्हणाले.
लाडका जावई योजनाही आणतील
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महायुती सरकारला बहीण आठवली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता सरकार मतदारांना खुश करण्यासाठी काहीही घोषणा करू शकते. एखादा लाडका जावई योजनाही आणतील. पण येणारे सरकार आपले आहे. आपले सरकार आले की या सरकारपेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला देणार. हे निवडणुकांसाठी घोषणा करत आहेत मात्र आपल्या योजना चांगल्या, ठोस आणि दीर्घकालीन असतील.