Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न ; दीडशे महिलांसह ३५० आंदोलनकर्ते ताब्यात

11

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत विदर्भवादी कार्यकर्त्यांनी ऑगस्ट क्रांती दिनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी थेट विधानभवनावर धडक देऊन विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. कडक पोलिस बंदोबस्तमुळे त्यांचा डाव उधळला गेला प्रवेशद्वार आणि परिसरातील वृक्षावर झेंडा फडकवण्यात कार्यकर्त्यांना यश आले. दरम्यान, पोलिसांनी दीडशे महिलांसह ३५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन काटोल मार्गावरील पोलिस मुख्यालयात नेले. नजिकच्या काळात तीव्र आंदोलनाचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

वेगळे राज्य, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, वीज दरवाढ मागे घ्यावी आणि स्मार्ट मीटर लावू नये, आदी मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन चालले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळण्यात आला.

यशवंत स्टेडियम येथून विधानभवनपर्यंत लाँग मार्च काढण्यात आला. डोक्यावर टोपी, हातात झेंडे आणि फलक घेऊन वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, महाराष्ट्रवादी चले जाओ, अशा घोषणा देत कार्यकर्ते निघाले. शनि मंदिर, टेकडी मार्गे मोर्चा झिरो माईलकडे येताच पोलिसांनी अडवला. समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी आधीच विधानभवनावर वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवणार या आंदोलनाची घोषणा केल्याने पोलिसांनी विधानभवनाला चहुबाजूनी सुरक्षेचे कडे उभारले होते.

उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांना हुलकावणी देत बॅरिकेड्स पाडले आणि विधानभवनकडे जाण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे कूच केले. तसेच, आत शिरण्यासाठी चढले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्यापूर्वी प्यारू नौशाद आणि तारेश दुरुगकर यांनी प्रवेशद्वारावर विदर्भाचा झेंडा लावला. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

विधानभवनकडे जाणाऱ्या मार्गांवर कडक सुरक्षा बंदोबस्तासह बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवण्यात आली होती. आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मोर्चा अडवल्यानंतर कुणीही मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले. पोलिसांनी समितीचे प्रमुख माजी आमदार वामनराव चटप, प्रकाश पोहरे, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर यांच्यासह सुमारे दीडशे महिला व दोनशे पुरुष आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. अरुण केदार तसेच, अन्य नेते व कार्यकर्ते रस्त्यावर बसले. मस्की दाम्पत्य पिंजऱ्यातून आंदोलनस्थळी आले. १५ ऑगस्टनंतर श्रीमती मस्की बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत.

ही आरपारची लढाई आहे. आता शांत बसणार नाही. विदर्भ मिळवण्यासाठी टोकाचे आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. शंभर वर्षांहून अधिक जुन्या मागणीची दखल घेतली जात नाही, हे वैदर्भीयांचे दुर्दैवी आहे, असा संताप आंदोलनकर्त्यांनी केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.