Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आमदार वैभव नाईकांनी वाचला तक्रारीचा पाढा…
आमदार वैभव नाईक म्हणाले, गेल्या १० वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले तीनही मंत्री हे महायुतीतच आहेत. विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अडीच वर्षे, उदय सामंत यांनी अडीच वर्षे आणि दीपक केसरकर यांनी ५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले. आणि त्यांच्या जोडीला केंद्रीयमंत्री नारायण राणे देखील होते. मात्र या चारही मंत्र्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडविता आलेले नाहीत. चारही मंत्री अकार्यक्षम ठरले आहेत. सिंधुदुर्गातील प्रश्नांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारावरूनच हे सिद्ध होते. आता जनता दरबाराच्या त्यानिमित्ताने तरी जिह्यातील जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना कळतील.
जिल्ह्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना ते कधी कळलेच नाहीत. आणि त्यांनी कळूनही घेतले नाहीत. प्रश्न सोडविण्यापेक्षा निवडणुकीत पैसे वाटणे हे त्यांना सोपे वाटते. पूरस्थितीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले परंतु विद्यमान खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यात मोठा पाऊस पडलाच नाही असे सांगून नुकसानग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले. आणि नुकसानग्रस्तांना एक रुपयाची देखील नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याचबरोबर मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही नुकसान भरपाईमध्ये कोकणचा समावेश सरकारने केलेला नाही. ही शिंदे-फडणवीस सरकारने जनतेची केलेली घोर चेष्टा आहे.
जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपुऱ्या सोयींमुळे मेडिकल कॉलेजला दंड भरावा लागला. रुग्णांना देखील आवश्यक उपचार मिळत नाहीत. १०८ रुग्णवाहिका मिळत नाही. कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालयात फर्निचरसाठी शिंदे- फडणवीस सरकार पैसे देत नाहीत म्हणून सी. एस.आर. फंडाची मदत घ्यावी लागते. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा रामभरोसे आहे.
फळ पीक विम्याचे पैसे, काजू अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. खावटी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही खावटी कर्जे माफ केलेली नाहीत. जिल्ह्यात हत्ती प्रश्न कायम आहे. वन्यप्राण्यांकडून शेतीचे दरवर्षी कोट्यावधींचे नुकसान होते. सुमारे ८०० शेतकऱ्यांचे शेती संरक्षण शस्त्र परवाने दिलेले नाहीत. धनदांडग्यांना मात्र आत्मसंरक्षण शस्त्र परवाने दिले जातात.आकारी पड, वनसंज्ञा जमीनीबाबत निवडणुकीत केवळ आश्वासन दिली जातात जमिनीचे प्रश्न जैसे थे आहेत.पालकमंत्र्यांना याचे काहीच पडलेले नाही.
लोकांना एसटी सुविधा वेळेवर मिळत नाही. येथील एसटी गाड्या इतर विभागात पाठविल्या जात आहेत. एसटी महामंडळ तोट्यात असून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठीचे एसटी बसचे भाडे अद्याप सरकारने दिलेले नाही.चुकीच्या पद्धतीने जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आले. घोटगे सोनवडे घाट, आंजिवडे घाट रस्त्याचे आश्वासन देऊन देखील प्रश्न सुटलेले नाहीत.जिल्ह्यातील नगरपंचायातींवर प्रशासक नेमले असून त्यांची साधी आढावा बैठक पालकमंत्र्यांनी घेतलेली नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी झोपून आहेत.
तलाठी पासून ते जिल्हाधिकारी पर्यंत पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. महसूल यंत्रणेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे.तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हजारो प्रकरणे, दावे प्रलंबित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात राजकीय ठेकेदारी सुरू असून एकही काम स्पर्धात्मक होत नाही.त्यामुळे कामाचा दर्जा टिकविला जात नाही.आजी माजी तीनही पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्या अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्यात शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. भाजपने लोकसभा आणि पदवीधर निवडणूक पैशाच्या मस्तीवर जिंकल्यामुळे जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काहीही पडलेले नाही. मात्र आता असे चालणार नाही.हे सर्व प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून जनता दरबार घ्या. असे आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले आहे.