Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिलिंद नार्वेकर अदृश्य हातामुळे निवडून आले, माझ्यासाठी एक असाच अदृश्य हात हवा; उदय सामंतांचा मिश्किल अंदाज
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या मोबाईल ॲपचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी सामंत बोलत होते. यावेळी माध्यमिक पतसंस्थेचे चेअरमन सागर पाटील, व्हाईस चेअरमन केसरकर, संचालक किशोर नागरगोजे आदी संचालक माध्यमिक शिक्षक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र हरावडे तर आभार श्रीमती तांबोळी यांनी मानले.
विधानसभा उमेदवारीचे संकेत
सामंत पुढे म्हणाले की, पक्षीय राजकारण करू नका. मात्र गेल्या पंधरा वर्षात सगळ्यात जास्त वेळा तुमच्याकडे कोण लोकप्रतिनिधी आला? मग तुमची जबाबदारी नाही का? असा सवाल त्यांनी केला. गेल्या पंधरा वर्षात सगळ्यात जास्त वेळा कोण आला आहे याचा तुम्ही विचार करा. भविष्यात दोन महिन्याने महाराष्ट्रात लोकशाहीमधली मोठी प्रक्रिया सुरू होणार आहे, तेव्हा बघा जमलं तर याचा आवर्जून विचार करा. या निवडणुकीत ही माझी पाचवी टर्म आता येणार आहे, तेव्हा राजकारण बाजूला ठेवून माझ्या सारख्याला सहकार्य करा एवढीच विनंती करतो, असं सांगत उदय सामंत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
जुन्या पेन्शबाबत सरकार सकारात्मक
माझ्या माध्यमिक शिक्षकांना सरकारची ताकद देणं, त्यांना राजाश्रय देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. यावेळी जुन्या पेन्शनबाबत शासन सकारात्मक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार हे सकारात्मक असल्याची माहितीही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. जुन्या पेन्शन बाबत तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याचे काम हे सरकार म्हणून केलं जाईल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मोबाईलवर येतं ते सगळं खरं नाही
मोबाईलवर हल्ली एडिटर झाले आहेत, याचा प्रत्यय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाबाबत आला. यांचं पेन्शन संदर्भातलं भाषण एडिट करून, मागची पुढची वाक्य काढून दाखवण्यात आली. अलीकडे लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार आहे, असा फेक नेरेटिव्ह काही लोकांनी सेट केला, तो याच मोबाईल यंत्राच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे मोबाईलवर हल्ली येतं ते सगळंच खरं आहे असं समजण्याचही कारण नाही, असेही परखड विधान पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं.
पत्रकारांबाबतही त्यांनी यावेळी मत व्यक्त करताना मोबाईल ॲप हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. पण आधुनिक क्षेत्रात सामोरे जाताना एखाद्याचं करिअर बरबाद होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. चुकीचा असेल तर छापून आणा आणि वाईट काम केले असेल त्यावर टीका करा. पण एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे करिअर बरबाद करण्यासाठी जे काही लेखक बनलेले आहेत ते कमी करा, असंही ते म्हणाले.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या कामाचं कौतुक
यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या ठेवींवर बसणारा इन्कम टॅक्स पंचवीस कोटी रुपये माफीसाठीचे निवेदन संस्था अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आले. याबाबत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, ते माझ्यावर सोडा. ते पुढच्या आठ दिवसात केले जातील अशी ही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षकांनी मला विज्ञान भवन होण्यासाठी निवेदन दिलं आहे, हे विज्ञान भवन एका वर्षाच्या आत त्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. आपल्या जिल्ह्यातील शिक्षक हे पगाराच्या आणि जुन्या पेन्शनच्या पलीकडे जाऊनही विचार करू शकतात, हे महाराष्ट्रात मी सगळ्यात प्रथम कुठे बघितले असेल तर ते रत्नागिरीमध्ये, असेही ते म्हणाले.
तसंच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या कामाचं कौतुक करत त्यांनी, आपण जेव्हा महाराष्ट्रात फिरत असतो त्यावेळी अभिमानाने सांगतो, की रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघात असलेली रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे काम ही सहकार क्षेत्रातील सगळ्यात आदर्श पतपेढी आहे असंही सामंत म्हणाले.
मीदेखील पाली प्राथमिक शाळेत शिकलो, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलं, याच प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या जोरावरच माझ्यासारखा कार्यकर्ता सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असल्याचं सांगत शिक्षक हेच विद्यार्थी घडवत असतात असे गौरवोद्गार उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.