Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune News: हजारभर दस्त नियमबाह्य; पुण्यासह मुंबईतील दुय्यम निबंधक कार्यालयांतील प्रकार उघडकीस

9

पुणे : एखाद्या मालमत्तेची अथवा सदनिकेची दस्त नोंदणी करताना ‘महारेरा’, तुकडेबंदीचे नियम धाब्यावर बसवून पुण्यासह मुंबईतील काही दुय्यम निबंधक कार्यालयांतून एक हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही नोंदणी करताना ७२०पेक्षा अधिक दस्तांमध्ये कमी रकमेचे मुद्रांक शुल्क भरल्याचा आक्षेप तपासणी पथकाने नोंदवला आहे. त्यातून राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

दस्तांच्या तपासणीचा अंतरिम अहवाल सरकारला पाठविण्यात आला असून, यापुढेही तपासणी सुरूच राहील. पुण्यासह अनेक शहरांसह जिल्ह्यांमध्ये तुकडाबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा), अकृषक (एनए) कायद्याचा भंग केल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण श्रावण हर्डीकर यांनी सुमारे ४४ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. तरीही आजमितीला बोगस एनए, ‘महारेरा’ची बनावट प्रमाणपत्रे आणि तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्याच्या कलम ४४चे उल्लंघन करून दस्त नोंदणी सुरू असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या सचिवांनी सात फेब्रुवारीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांना दस्त तपासणीचा आदेश दिला होता. त्यानुसार एप्रिलपासून पुण्यासह मुंबईतील दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्तांची तपासणी करण्यात आली. पाच वर्षांतील दस्तांची तपासणी होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘मटा’ने प्रकाशित केले होते.

पाच वर्षांतील दस्तांची तपासणी

पुण्यासह मुंबईतील २०१९ ते २०२४ पर्यंतचे दस्तांची तपासणी सुरू आहे. पुणे विभागासाठी नागपूर विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांचे, तर मुंबई विभागासाठी लातूरचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. दर वर्षी पुणे शहर आणि जिल्ह्यात १० ते १५ लाख दस्तांची, तर मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सुमारे २० लाख दस्तांची नोंदणी होते. पुणे शहर आणि जिल्हा तसेच मुंबई शहर आणि जिल्हा या चार जिल्ह्यांतील बक्षीसपत्रे, खरेदीखत, जमीन हस्तांतरण अशी सुमारे ३५ लाख दस्तांची तपासणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत, असे नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.
राज्य सरकारच्या ‘लेक लाडकी’ योजनेचा पहिला हप्ता जमा, एकूण १ लाख मिळणार
तपासणीतील ठळक निष्कर्ष?

– पुणे शहर आणि जिल्ह्यातील सहा कार्यालयांची दस्तांची तपासणी पूर्ण
– सहा कार्यालयांमधून एकूण दस्तांपैकी १३२२ दस्तांमध्ये आक्षेप आढळले
– त्यापैकी ४६६ दस्त कमी मूल्यांकनाचे, तर उर्वरित ८५६ दस्तांमधून नोंदणी कायद्याचा भंग
– मुंबई विभागातील सहनिबंधक वर्ग दोनचे मुंबई शहर क्रमांक तीन या कार्यालयाची तपासणी
– मुंबईत ४४८ दस्तांमध्ये आक्षेपार्ह बाबी.
– त्यामध्ये २५४ दस्तांची कमी मूल्यांकन करून नोंदणी, तर १९४ दस्तांमध्ये नोंदणी कायद्याचा भंग

राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुणे आणि मुंबईतील काही दुय्यम निबंधक कार्यालयांतील दस्तांची पथकांद्वारे तपासणी करण्यात आली. पथकांच्या अहवालात काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत. त्या संदर्भातील अंतरिम अहवाल सरकारला पाठविला आहे.- हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.