Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Manoj Jarange: मराठ्यांची ताकद दाखवा! आरक्षणासाठी जरांगेंचे आवाहन, २९ ऑगस्टला निवडणुकीबाबत घेणार निर्णय

12

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी २९ ऑगस्टला आंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मराठा समाजाने निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे, याबाबत निर्णय घेणार आहे. तोपर्यंत कुणबी ही मराठा समाजाची पोटजात म्हणून जाहीर करण्यासह सर्व मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. आम्हाला हक्काचे आरक्षण द्या, अन्यथा राज्यात तुमची एकही जागा निवडून येऊ देणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सरकारला दिला.

अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्यातर्फे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सारसबागेपासून थोरले बाजीराव पेशवे रस्ता, जंगली महाराज रस्त्यामार्गे खंडूजीबाबा चौकापर्यंत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या वेळी जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला; तसेच राज्य सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला.

‘पुण्यातील समाजबांधवांची गर्दी पाहून निम्म्या मंत्रिमंडळाची झोप उडाली असून, मराठा समाज कधीच एक होऊ शकत नाही, हा गैरसमज दूर झाला आहे,’ असे नमूद करून, जरांगे यांनी राज्यात मराठ्यांना ताकद दाखविण्याचे आवाहन केले. ‘येत्या २९ तारखेला आंदोलनाची वर्षपूर्ती असून, त्या वेळी उमेदवार उभे करायचे की विरोधकांना पाडायचे याचा निर्णय घेऊ. मराठा समाजाला त्रास देणाऱ्याला निवडून येऊ देणार नाही. समाजाच्या शक्तीपुढे कोणतीही सत्ता टिकणार नाही. आतापर्यंत आपण सत्तर टक्के आरक्षण मिळविले असून, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्यास शंभर टक्के आरक्षण मिळेल. त्यासाठी पुण्याप्रमाणेच आता मुंबईलाही फेरफटका मारून समाजाची एकजूट दाखवून द्या. मुख्यमंत्र्यांनी मराठा व कुणबी एकच असल्याचा कायदा मंजूर करावा, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ‘ईडब्लूएस’चे आरक्षण पुन्हा लागू करावे; तसेच ‘एसईबीसी’चा आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्याला ओबीसीतून आरक्षणाचा पर्यायही ठेवावा. विद्यार्थ्यांचे वाटोळे झाल्यास सरकार पाडल्याशिवाय सोडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.
Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज
‘फडणवीस, भुजबळांवर सडकून टीका’

मनोज जरांगे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर सडकून टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. फडणवीस यांनी सापळा रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली. भुजबळ यांच्या माध्यमातून समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी कट रचण्याचा प्रयत्न केला. भुजबळ हे बोगस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, ओबीसींप्रमाणेच मराठ्यांचे आरक्षण खात आहेत,’ अशी टीका जरांगे यांनी केली. ‘मागील दरवाजाने आमदार झालेल्या महिला माझ्याविरोधात बोलत आहेत,’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘समाजामुळेच मोठे झालेला कोकणातील एक नेता समाजाच्या विरोधात बोलत आहे. त्यांनी फडणवीस यांच्या नादी लागू नये, अन्यथा समाज तुम्हाला सोडणार नाही,’ असा इशाराही जरांगे यांनी नारायण राणेंना नामोल्लेख न करता दिला.

‘सलाईन लावून व्यासपीठावर’

मनोज जरांगे हाताला सलाईनची पट्टी आणि कमरेला पट्टा लावूनच व्यासपीठावर आले. ‘माझे शरीर साथ देत नसले, तरी समाज महत्त्वाचा असून, शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजाशी गद्दारी करणार नाही. त्यामुळे मला गोळ्या घालणे हा एकमेव पर्याय माझ्या विरोधकांकडे आहे. परंतु, जो गोळ्या घालेल, त्याला महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही,’ असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.