Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Independence Day 2024: माऊण्ट युनामवर फडकणार ‘तिरंगा’; मुंबईकर वैभव ऐवळे ६,११० मीटर उंचीवर करणार ध्वजवंदन
वैभव ऐवळेने २०१८पासून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा ध्यास घेतला. त्या वर्षी देशाचा ७२वा स्वातंत्र्यदिन होता. त्या निमित्ताने त्याने आफ्रिकेतील सर्वात उंच असलेल्या माउंट किलिमांजारो या शिखरावर चढाई केली. तेथे त्याने आपला तिरंगा फडकवत राष्ट्रगीतही गायले. त्यानंतर सुरू झाली ही अनोखी शिखरयात्रा! ‘लहानपणापासून मला गिर्यारोहणाची आवड होती. सुरुवातीला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मी भटकंती केली. त्यानंतर हिमालयातील शिखरे आणि पर्वतरांगा मला खुणावायला लागल्या. २०१६-१७ या वर्षी देशाचा ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा होत होता. त्यानिमित्ताने आपण आपल्या गिर्यारोहणाची आवड आणि देशाप्रती वाटणारे प्रेम यांची सांगड घालावी, असे सुचले. त्यातूनच २०१८मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट किलिमांजारोवर तिरंगा फडकवण्याची संकल्पना पुढे आली. त्यानंतर करोनाचे एक वर्ष सोडले, तर दरवर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या ना कोणत्या शिखरावर ध्वज फडकवून साजरा करण्याचा उपक्रम नियमित करतो आहे,’ असे वैभवने सांगितले.
आतापर्यंत वैभवने युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एलब्रस, लडाखमधील माउंट जो जांगो, कांग यात्से, युटी कांग्री ही शिखरे सर करत त्यावर तिरंगा फडकवला आहे. यंदा तो हिमाचल प्रदेशातील माउंट युनामच्या मोहिमेवर रवाना झाला आहे. वैभवने मुंबईहून ८ ऑगस्ट रोजी प्रयाण केले असून रविवारपासून त्याने हिमाचलमधून माउंट युनामसाठीची चढाई सुरू केली आहे.
‘हिमालयात किंवा त्या तोडीच्या उंचीवर निसर्गाची आव्हाने प्रचंड असतात. कधी कधी पूर्ण दिवस बसून राहावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून मी दोन दिवस जादा ठेवूनच चढाईला सुरुवात करतो. शिखर सर करणे, हे महत्त्वाचे आहेच. पण स्वातंत्र्यदिनी त्या शिखरावर आपला झेंडा रोवणे, हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या पद्धतीने माझे नियोजन असते,’ असे वैभव सांगतो.
मोहिमेद्वारे अवयवदानाचा प्रचार
या मोहिमेद्वारे वैभव अवयवदानाचाही प्रचार करत आहे. आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेत वैभव यांनी आपले सर्व अवयवदान केले आहे. आपण सगळ्यांनी मिळून समाजामध्ये अवयव दान करण्याबाबत जनजागृती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे वैभवला वाटते. विशेष म्हणजे वैभवच्या या ‘तिरंगा’ मोहिमांची नोंद गिनीज बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस,आशिया बुक ऑफ रेकॉर्डस अशा नामांकित रेकॉर्ड बुक्समध्ये झाली आहे.