Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नांदेड येथे रविवारी काँग्रेसच्या विभागीय बैठक पार पडली. बैठकीदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. १२ फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे. पण, नांदेडला विशेष करून मराठवाड्याला खरं स्वातंत्र्य १२ फेब्रुवारीला मिळाल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसची बैठक संघटनात्मक बांधणीसाठी होती की व्यक्तिगत द्वेषासाठी?
अशोक चव्हाण म्हणाले, “नांदेडमध्ये झालेली काँग्रेस पक्षाची बैठक संघटनात्मक बांधणीसाठी होती की व्यक्तिगत द्वेषासाठी असा प्रश्न पडतो. नाना पटोलेंना अशोक चव्हाणांवर टीका केल्याशिवाय काहीच जमत नाही. ते आपल्या सहकाऱ्यांबाबत असेच लुज टॉक करतात. काँग्रेस पक्षात प्रचंड गटबाजी आहे. गटातटाच्या राजकारणात चांगली लोक बाहेर गेली”.
नाना आपला परफॉर्मन्स काय? आपण बोलता किती?
नाना पटोले यांनी २५ जुलै २००९ रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा साकोली मतदारसंघाला स्वातंत्र्य मिळाले होते का? त्यानंतर १८ जून २०१८ रोजी भाजप सोडून ते परत काँग्रेस पक्षात आले. मग तो साकोली मतदारसंघासाठी पारतंत्र्य दिन म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित करत मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेले यश एक राजकीय अपघात होता. नाना पटोलेंना व्यक्तिगत यश मिळाले, हा त्यांचा गैरसमज आहे. स्वत:च्या जिल्ह्यात त्यांनी किती जागा निवडून आणल्या? आपला परफॉर्मन्स काय? नाना पटोलेंनी काय बोलावे याचे भान ठेवावे, अशा शब्दात त्यांनी सुनावले.
‘लाडकी बहीण’वरून अशोक चव्हाण यांची विरोधकांवर टीका
तसेच लाडकी बहीण योजनेला संशयास्पद बघितले जात आहे. एका चांगल्या योजनेला सावत्र वागणूक दिली जात आहे. लोकसभेत संविधान व आरक्षणाबाबत फेक नेरेटिव्ह पसरविला. तोच पॅटर्न विधानसभेत राबविणार असल्याचे दिसते. नेहमीच तुम्ही लोकांना मुर्ख बनवू शकत नाहीत. लोक ओळखून आहेत. विरोधकांना जनमत महायुतीच्या बाजूने जाईल, अशी भीती वाटत आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
अमित देशमुख यांना अनुभव नाही
काँग्रेसच्या बैठकीत आमदार अमित देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्यावार टीका केली होती. अशोक पतझड नंतर वसंतऋतू फुलला असे देशमुख म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांना टोला लगावला. अमित देशमुख यांना अनुभव नाही. वयाने छोटे आहेत आणि वैचारिक परिपवक्ता नसल्याचे चव्हाण म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावे असं मला वाटतं नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.