Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mumbai Vidhan Sabha : लोकसभेत पक्षाची दमदार कामगिरी, विधानसभेसाठीही कंबर कसली, काँग्रेसमधून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या तयारीचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढविला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेले यश लक्षात घेता पक्षाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. १० ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करण्याची सूचना पक्षाकडून करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र काँग्रेसकडे मुंबईतील ३६ जागांसाठी तब्बल दोनशेहून अधिक जणांनी अर्ज सादर केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
धारावी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानलो जातो. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातून संधी मिळावी याकरिता एकूण १८ जणांनी या मतदारसंघासाठी अर्ज केले आहेत. यात पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे कळते. धारावीतील स्थानिक महेश साळवे, संदेश कोंडविलकर, वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गिरीदेसाई, भाऊ तुषार गायकवाड यांच्यासह अनेक नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धारावीतील राजकारण तापले
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा आगामी निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी इच्छुकांची रीघ लागली आहे. या मतदारसंघासाठी अनेक ज्येष्ठ सदस्यांनी अर्ज केले असतानाच वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गिरीदेसाई यांच्यासह तुषार गायकवाड यांनीही अर्ज केल्यामुळे पक्षाला अंतिम उमेदवार निवडताना एकनाथ गायकवाड यांची धारावीतील गादी चालवायची की सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायची हा निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच धारावी मतदारसंघातील काही माजी नगरसेवकांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे याची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रमुख आव्हान पक्षश्रेंष्ठीवर असणार आहे.