Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन?
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महायुतीने आता आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्रीतरीत्या समन्वय साधून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक नाशिकमध्ये सोमवारी (दि. १२) बोलविण्यात आली होती. या बैठकीला मंत्री उदय सामंत यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, खासदार स्मिता वाघ, शिवसेना नेते सचिन जोशी, नरहरी झिरवाळ, योगेश टिळेकर, अनिकेत तटकरे, देवयानी फरांदे, अॅड. राहुल ढिकले, सरोज अहिरे, मंजुळा गावित या आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन विरोधकांकडून सोशल मीडियाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना सडेतोड उत्तर द्यावे. राज्यात एका पक्षाच्या नेत्यावर टीका झाली, तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर रान पेटवले. त्या पक्षापेक्षा आपली ताकद अधिक आहे. आपणही आपल्या नेत्यावर टीका केली तर महाराष्ट्र कसा पेटवू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे, असे आवाहन सामंत यांनी मनसेचे नाव न घेता केले. महायुतीने दिलेला उमेदवार मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला निवडून आणण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करावा. यासाठी एकजूट महाराष्ट्र अभियान आयोजित करण्यात आले असून, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत येत्या ३० ऑगस्टला नाशिकमध्ये होणारा महामेळावा ऐतिहासिक ठरावा, यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले.
समन्वय बैठकीतच असमन्वय
या बैठकीत आरपीआयचे नेते व मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेण्यात आले नाही. यामुळे प्रकाश लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या बैठकीत मित्रपक्ष रिपाइंचे नाव घेण्यास लाज कसली, अशा शब्दात कानटोचणी करताना रिपाइंला सन्मानाची वागणूक दिल्यासच महायुतीत समन्वय राहील, असा इशारा लोंढे यांनी दिला. तसेच लाडकी बहीणच्या विभागवार समित्यात आम्हाला का डावलले असा जाबही त्यांनी नेत्यांना विचारला. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
निर्णयांची पुस्तिका छापणार : भुसे
गेल्या दोन वर्षांत जेवढे लोकांसाठी चांगले निर्णय झाले, तेवढे गेल्या २० वर्षांत झाले नाहीत असा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी केला. त्यामुळे महायुती सरकारच्या काळात घेतलेल्या चांगल्या निर्णयाची पुस्तिका तयार करून ती घरोघरी पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.