Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या वेळी मंडळाचे सदस्य आमदार आशीष जयस्वाल, आमदार संदीप धुर्वे, प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेनुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रांना शिंदे यांनी बैठकीत मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभावी राबविण्याचा आदेशही त्यांनी या वेळी दिला.
वनपाटील नियुक्त करा
मनुष्य आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते त्याला तत्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमतानाच वनपाटील यांची देखील नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली. शिंदे यांनी याबाबत नियोजन करण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना दिल्या. पेंच येथे पानमांजर, नाशिक येथे गिधाड आणि गडचिरोली येथे रान म्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमण मार्गातील चार विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. बैठकीस मंडळाचे सदस्य किरण शेलार, पुनम धनवटे, अनुज खरे, अंकुर पटवर्धन, चैत्राम पवार, विनायक धलकर उपस्थित होते.