Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मध्य रेल्वेवरील कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी ही दुर्घटना घडली होती. एक प्रवासी लोकलमधून पडल्याची माहिती गार्डने मोटरमनला दिली. त्यानंतर काही क्षण तिथे लोकल थांबवून प्रवाशांना लोकलमधून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला मदत करण्यासाठी तिथे उतरण्यास सांगण्यात आले.
संबंधित प्रवाशाच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत होता. पाच प्रवाशांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दिवा आणि कोपर दोन्ही रेल्वे स्थानके अपघात स्थळापासून दूर होती. त्यामुळे या प्रवाशांनी डोंबिवलीकडून येणाऱ्या एका लोकलला हात केला. त्यामुळे लोकल काही क्षण प्रवासी पडल्याच्या ठिकाणी थांबवण्यात आली.
जखमी प्रवाशाला एका डब्यात चढवून त्याला दिवा येथे रेल्वे सुरक्षा जवानांच्या ताब्यात पुढील उपचारासाठी देण्यात आले. या प्रवाशाची ओळख पटली नव्हती. हा प्रवासी कल्याणकडून येणाऱ्या जलद लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होता. डोंबिवली, कोपरनंतर लोकलने वेग घेताच तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडला असण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली.
दर आठवड्याला दोन ते चार प्रवासी कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पडून मृत्युमुखी पडत असल्याने या संदर्भात रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. उपनगरी रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रत्येक बैठकीत या भागातील अपघातांचा विषय उपस्थित करतात. गंभीर समस्यांकडे लक्ष वेधून अधिकाऱ्यांकडे या विषयी उपाय योजना करण्याची मागणी करत असतात. मात्र रेल्वे प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.