Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गेली १७ वर्षे मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. जे काम पूर्ण झाले आहे त्याची अवस्था इतकी वाईट आहे, की तो मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. रस्त्यांवर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. अशा ही परिस्थिती गणेशोत्सवाकरता मुंबई ठाण्यातील चाकरमानी या मार्गावरून कोकणात जाण्यासाठी गाडीने प्रवास करतात, मात्र दुर्दैवाने जिथे आठ ते नऊ तासात कोकणात पोहोचायचे आहे, त्याऐवजी १६ ते १८ तास प्रवास करावा लागतो. अशावेळी अनेक अपघातही होतात. आजवर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे जीव गेले आहेत, अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत.
संबंधित मंत्री आश्वासने देतात मात्र त्यापुढे काहीच हालचाल होताना दिसत नाही. या सगळ्या अन्यायाविरुद्ध मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती अनेक वर्षापासून या महामार्गाचे काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करत आहे. अनेक आंदोलने या समितीच्या वतीने करण्यात आली आहेत. मात्र अजूनही हा मार्ग सुधारला जात नाही, म्हणून या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनी माणगाव एसटी स्टँड येथे उपरोक्त समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
उपरोक्त आंदोलनात आता कोकणातील कवी, साहित्यिक, कलाकार मंडळी देखील उतरणार आहेत. कवी, लेखक, कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सुद्धा आपला जाहीर पाठिंबा या आंदोलनास व्यक्त केला आहे. तसेच सर्व साहित्य कलाकार यांनी आपला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.