Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी अधिक आहे. कोकण विभागातही दोन ते तीन अंशांनी, तर मराठवाड्यात तीन ते चार अंशांनी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. सध्या वाढलेल्या तापमानाचा फटका पिकांना बसू शकतो, याबद्दल इशारा देण्यात आला आहे. विदर्भाच्या काही भागांत १५ ते २२ ऑगस्टच्या आठवड्यात पाऊस पडू शकतो. उर्वरित राज्यात मात्र फारसा पाऊस नाही. वाढलेल्या तापमानामुळे मेघगर्जनेसह संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता आहे.
मुंबईमध्ये कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंदवले जात आहे. वाढलेले तापमान आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता अधिक जाणवत आहे. रत्नागिरी केंद्रावर गुरुवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. मध्य महाराष्ट्रात पुणे येथे ४.४, लोहगाव येथे ४.८, सातारा येथे ५.४ अंशांनी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. मराठवाड्यातही छत्रपती संभाजी नगर येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक नोंदले गेले. विदर्भात ब्रह्मपुरी आणि यवतमाळ येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान मोठ्या फरकाने अधिक होते. गुरुवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले. ३५.६ अंश सेल्सिअससह हे तापमान सरासरीपेक्षा ५.७ अंशांनी अधिक होते. चंद्रपूर येथेही ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
कमाल तापमानाची ही स्थिती कदाचित कमी-जास्त प्रमाणात २५ ऑगस्टपर्यंतही राहू शकते, असा अंदाज निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. वाढलेले तापमान, हवेतील दमटपणा जाणवून पिकांना मातीतून मिळणारे पाणी अपुरे पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच वाढत्या दमटपणातून पिकावर कीड पडू शकते. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागातर्फे शेतीसाठी वर्तवले जाणारे अंदाज आणि मार्गदर्शन याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २२ ऑगस्टनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मात्र या काळात मराठवाड्यात पाऊस फारसा नसेल. २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत विदर्भ आणि उत्तर कोकणाचा काही भाग वगळता राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.