Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा जनता दरबार आठवड्यातील दर बुधवारी दादरच्या शिवसेना भवनात भरतो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन नांदगावकर अनेकांचे प्रश्न सोडवत असतात. कोणाच्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या असो किंवा कोणाच्या आर्थिक. शिवसेना भवनात सगळ्यांच्या समस्या ऐकून ते कधी शिवसेना स्टाईलने त्यांचे प्रश्न सोडवतात, तर कधी प्रेमाने.
बुधवारी घडलेल्या एका भावनिक प्रसंगामुळे नितीन नांदगावकरांसह उपस्थितही हेलावले. गतिमंद मुलगी पदरात आल्याने संबंधित महिलेच्या पतीने तिची साथ सोडली होती. कायदेशीर प्रक्रियेनुसार घटस्फोट घेऊन पती विभक्त झाला. कोर्टाने पतीला पत्नी आणि मुलीला पोटगी म्हणून दरमहा २० हजार रुपये देण्याचा आदेश दिला. घटस्फोट मान्य झाला, पण न्यायालयाचा निर्णय पतीला मान्य नव्हता. त्याने तिला दरमहा पैसे देण्यास नकार दिला.
महिलेने पोलिसांपासून कोर्टापर्यंत सर्वत्र दारं ठोठावली, पण पदरी निराशाच पडली. अखेर ती आपल्या गतिमंद मुलीला घेऊन शिवसेना भवनात नितीन नांदगावकरांच्या जनता दरबारात आली. न्यायाच्या मागणीसाठी ती अक्षरशः रडू लागली. तिची अवस्था पाहून नितीन अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या दोन शिलेदारांना तिच्या पतीकडे पाठवून शिवसेना भवनात बोलावले.
त्याला ना गतिमंद लेकीची काळजी होती, ना पत्नीची, असं त्याच्या वागण्यातून दिसत होतं. कोर्टाचा निर्णय बंधनकारक असल्याचं त्याला समजावण्याचा प्रयत्न झाला, पण तो बधला नाही. त्याचा उर्मटपणा वाढताच नांदगावकरांनी त्याला शिवसेनेचा हिसका दाखवला. त्यांचा रुद्रावतार पाहून अखेर तो नरमला आणि त्याने प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये देण्याचे मान्य केले.
गेल्या आठवड्यात महिलेला घटस्फोटीत पतीकडून पहिला हप्ता मिळाला. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने जनता दरबार गाठला. नितीन नांदगावकर आणि उद्धव ठाकरे यांचे डबडबल्या डोळ्यांनी तिने आभार मानले. आणि आपल्या पाठीराख्या भावाला राखी बांधली.
नितीन नांदगावकरांनी उपस्थितांना तिची हकीगत सांगितली. गहिवरल्या मनाने तिला आणि मुलीला शुभेच्छा देताना काही अडचण आल्यास सांगण्याचा सल्लाही दिला. रक्षाबंधनाच्या तोंडावर घडलेल्या या भावनिक प्रसंगी सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिला शुभेच्छा दिल्या.