Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Congress MLA joins NCP : मातोश्रीचं अंगण, अजितदादांचा सुरुंग आणि ‘हाता’ला झटका, काँग्रेस आमदार घड्याळ बांधण्याच्या तयारीत
झिशान सिद्दीकी यांचे पिता आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. सिद्दीकी ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेससोबत होते. मात्र त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेत बाबा सिद्दीकींच्या रुपाने राष्ट्रवादीला मुंबईत ताकद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तेव्हापासूनच झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र सहा महिने उलटल्यानंतरही लेक काँग्रेससोबत आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले होते. गुप्त मतदान असल्यामुळे आमदारांची नावं समोर आली नाहीत, मात्र काँग्रेसने अंतर्गत तपासातून सात जणांना ओळखल्याचं बोललं जात होतं. यात झिशान सिद्दीकी यांच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे झिशान हे कधीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
एकीकडे, या क्रॉस व्होटिंगचा संशय असलेल्या काँग्रेसमधील हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने तेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकामागून एक काँग्रेसला तीन झटके मिळण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.
झिशान सिद्दीकी यांना नाट्यमयरित्या आमदारकी मिळाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या तत्कालीन आमदार तृप्ती प्रकाश (बाळा) सावंत यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी (दिवंगत) माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली होती. त्यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता. शिवसेना आणि भाजपच्या वादाचा फटका बसून काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं होतं.