Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलिस भरतीत 'हायटेक कॉपी'; चार 'भावी पोलिसां'ची अशी पकडली चोरी, ठाण्यातील प्रकार

5

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार गैरमार्गाचा वापर करण्यासाठी हायटेक पद्धतीचा अवलंब करत आहेत. रविवारी झालेल्या लेखी परीक्षेच्यावेळी दोन उमेदवार चक्क इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करत पेपर सोडवत असल्याचे, तर एक उमेदवार कॉपी करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक उपकरणासह परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. अन्य एका उमेदवाराने लेखी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरण जवळ बाळगल्याची बाब समोर आली आहे. या सगळ्या प्रकारात चार उमेदवारांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांनी ही उपकरणे अशा ठिकाणी लपवली होती, की पोलिसही चक्रावून गेले.उजव्या कानामध्ये मायक्रो डिव्हाइस

ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाण्यातील परीक्षा केंद्र क्र. १८ येथे पोलिस तैनात करण्यात आले होते. या केंद्रामधील एक उमेदवार माइक स्पाय इयर पिससह जीएमएम मायक्रो बॉक्स या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी जालन्याच्या २२ वर्षांच्या उमेदवाराकडे चौकशी केली. त्याचे दोन्ही कान बारकाईने पाहिल्यानंतर त्याच्या उजव्या कानामध्ये एक मायक्रो डिव्हाइस आढळला. पोलिसांनी हे डिव्हाइस बाहेर काढल्यानंतर ते माइक स्पाय इयर पिस असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, त्याच्या शर्टाच्या खिशामध्ये एक जीएसएम मायक्रो बॉक्सही मिळाला. त्याने संबधित डिव्हाइसद्वारे प्रश्नांची उत्तरे बाहेरील व्यक्तीकडून घेत असल्याचे सांगितले.

याच परीक्षा केंद्रामधील आणखी एक उमेदवारही अशाच प्रकारच्या डिव्हाइसचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या २२ वर्षांच्या उमेदवाराची पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्याच्या पॅन्टच्या बॉटममधील फोल्ड केलेल्या शिलाईमध्ये एक माइक स्पाय इयर पिस आणि एक जीएसएम मायक्रो बॉक्स इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आढळला. हा उमेदवार संबधित डिव्हाइसद्वारे प्रश्नांची उत्तरे बाहेरच्या व्यक्तीकडून घेऊन पेपर सोडवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी डिव्हाइस जप्त करत दोन्ही उमेदवारांविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच त्यांना अटक केली.

Nagpur Crime: असा लेक नको! पाय दाबायला वडिलांचा नकार, मग मुलाने जे केलं त्याने अख्खं नागपूर हादरलं
ठाण्यातील अन्य परीक्षा केंद्रांवरील पोलिसांकडून केंद्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांची झडती घेण्यात येत होती. कॉलेजमध्ये असलेल्या केंद्रामध्ये सकाळी १०.३० वाजता एक उमेदवार प्रवेश करत होता. या उमेदवाराचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या मांडीच्या आतील बाजूला चिकटपट्टीने चिटकवलेला ब्ल्यूट्यूथ इअर पिस आणि अन्य एक वस्तू मिळाली. हा उमेदवार मूळचा जालन्याचा असून त्याचे वय २२ आहे. त्याने हे ब्ल्यूट्यूथ मोबाइल सदृश्य मोबाइल डिव्हाइसला कनेक्ट असल्याची माहिती दिली. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर असलेल्या नातेवाईक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसशी संपर्क करून प्रश्नांची उत्तर सांगणार होता, असेही त्याने सांगितले. हे डिव्हाइस जप्त करण्यात आले असून वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या उमेदवाराला अटक केली.

नौपाड्यात तिघांविरुद्ध गुन्हा

शाळेत असलेल्या परीक्षा केंद्र क्रमांक १०वर एका उमेदवाराची पोलिस तपासणी करत होते. यावेळी त्याच्याकडे एक चौकोनी इलेक्ट्रिक डिव्हाइस मिळाले. त्यामध्ये दोन सिमकार्ड आणि एक मायक्रो ब्ल्यूट्यूथ होता. हा उमेदवार छत्रपती संभाजीनगरचा असून चौकशीमध्ये त्याने त्याचा मित्र परीक्षा केंद्राच्या बाहेर कारमध्ये बसल्याचे सांगितले. त्यालाही तलावपाळी परिसरातून ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्याने संबधित उमेदवाराला प्रश्नांची उत्तरे सांगण्याविषयी अन्य एकाने सांगितले होते. या कामाचे त्याला २५ हजार रुपये मिळणार असल्याची बाब स्पष्ट झाली. याप्रकरणी उमेदवारासह तिघांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.