Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MH Election 2024 : नंदुरबार लोकसभेतील सहाही जागांवर काँग्रसने ठोकला दावा, उत्तर महाराष्ट्र विभागातील काँग्रेसच्या मेळाव्यात मागणी
उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, आ. शिरीष नाईक, आमदार शिरीष चौधरी, यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यात कॉंग्रेसला चांगलं वातावरण
ॲड.के.सी.पाडवी म्हणाले की, ”नंदुरबार जिल्ह्याला काँग्रेससाठी कायमच चांगले वातावरण असते. लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून आला आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभेतील सहाही विधानसभेत काँग्रेसला पोषक असे वातावरण असल्याने सर्व जागा काँग्रेसला सोडण्यात याव्या. वाटल्यास मित्र पक्षांना इतर ठिकाणच्या जागा द्याव्या. काँग्रेसचे सर्व जागा जिंकून देण्याची ताकद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे”.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार,नवापूर, शहादा-तळोदा, अक्कलकुवा-अक्रानी, साक्री तसेच शिरपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी तीन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. तर दोन मतदारसंघात काँग्रेसचे व एका मतदार संघात अपक्ष आमदार आहेत. विधानसभेच्या मागील पंचवार्षिकमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना सामना रंगला होता. तर शहादा-तळोदा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार उदेसिंग पाडवी हे अनेक दिवसांपासून मतदारसंघात तयारी करीत आहेत. ॲड. के. सी.पाडवी यांच्या मागणीमुळे महाआघाडीतील पक्षाच्या नेत्यांची गोची होणार आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
नंदुरबार येथे काँग्रेसतर्फे उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शासनावर हल्लाबोल करीत .राज्यातले तीन तोंडी पोकलॅन्ड सरकार हे राज्याची तिजोरी लुटत असून लोकांच्या घामाच्या पैशाची उधळण करुन हे स्वतचा गवगवा करुन घेत असल्याची टिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच ज्या जागा मिळतील त्या जिंकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे सांगत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून विधानसभेसाठी तयार राहावे असे आवाहन केले.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
या बैठकीला मार्गदर्शन करताना काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत करोडो चे घोटाळ्या करणाऱ्यांच्या खाते राज्याच्या तिजोरीची चावी दिली असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. राज्य शासन सध्या पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा अशी भूमिका बजावत आहे. असे सांगत बहिण लाडकी नाही तर सत्ता लाडकी आहे. राज्यात सध्या गुलाबी यात्रा निघाली आहे. मात्र लोकसभेत ही आंध्रातून काही नेते गुलाबी रंग घेऊन आले होते. मात्र महाराष्ट्राने त्यांना परत पाठवले. तशीच गत विधानसभेतही होईल. अशी टीका थोरात यांनी केली आहे.