Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसत आहे. ‘रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्याने रुग्णांना दाखल करून घेणे आम्ही टाळत आहोत,’ अशी माहिती कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने दिली. अनेक रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टरांना कनिष्ठ डॉक्टरांच्या जागी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वरिष्ठ डॉक्टरांनी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी सेवेत पुन्हा रूजू व्हावे, असे आवाहन प. बंगाल सरकारतर्फे करण्यात आले आहे.
डॉक्टरांचा मोर्चा
प. बंगालमधील विविध वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील कनिष्ठ डॉक्टरांनी बुधवारी मोर्चा काढला. चार किमी अंतराच्या या मोर्चात काही वरिष्ठ डॉक्टरही सहभागी झाले होते. सीबीआयचे कार्यालय असणाऱ्या सीजीओ संकुलापासून सुरू झालेला हा मोर्चा स्वास्थ्य भवन येथे विसर्जित करण्यात आला.
रुग्णालय सुरक्षेची सूत्रे सीआयएसएफकडे
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निर्देशांनुसार, आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सीआयएसएफचे (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) एक पथक बुधवारी रुग्णालयात दाखल झाले. या रुग्णालयातील सुरक्षेबाबत या पथकाने स्थानिक पोलिस व रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. सीआयएसएफचे १५० जवान या रुग्णालयात तैनात करण्यात येणार आहेत. सीआयएसएफने रुग्णालयाची सुरक्षा हाती घ्यावी, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानेही बुधवारी दिले.
सत्ताधारी खासदार आंदोलनावर ठाम
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू सेखर रॉय यांनी पक्षनेत्यांच्या आदेशावरून समाजमाध्यमांवरील निषेधाची पोस्ट हटवली असली, तरी या प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा पवित्रा त्यांनी कायम ठेवला आहे.
तीन पोलिस अधिकारी निलंबित
या रुग्णालयात गेल्या आठवड्यात जमावाकडून झालेल्या तोडफोडप्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये दोन सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे, असे कोलकाता पोलिसांनी सांगितले.