Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पीडित चिमुकलीच्या आईने सारा घटनाक्रम सांगितला
१६ ऑगस्टला आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की तुझ्या मुलीसोबतच्या मैत्रिणीने तिच्या वडिलांनी सांगितलं शाळेत त्यांच्या मुलीवर असा प्रकार घडला आहे. तुमच्या मुलीने तुम्हाला काही सांगितलं का असं त्यांनी विचारलं. त्यांनी जेव्हा हे विचारलं तेव्हा माझ्या मुलीला ताप आला होता. एक आठवडा आधीही तिला ताप आला होता, ताप हा असा अचानक येत नाही. मला शाळेत जायचं नाही, असं ती म्हणत होती.
१३ ऑगस्टला माझी मुलगी शाळेत गेली होती, त्यांची मुलगी शाळेत गेली नव्हती. त्यानंतर मला शाळेतून फोन आला की तुमची मुलगी खूप रडत आहे. रडायचं थांबत नाहीये. तिला घ्यायला या. मी माझ्या वडिलांना फोन केला की तिला घ्यायला जा. माझे वडील मुलीला शाळेतून आणायला गेले. त्यावेळी टीचरला पकडून माझी मुलगी बाहेर आली. एरव्ही ती एकटी बाहेर यायची.
तिने आजोबांचाही हात धरला. ती वाकडी तिकडी चालत होती. तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं. जताना ती नीट गेली, पण शाळेतून परतताना व्यवस्थित चालत नव्हती. तिला रात्री पुन्हा ताप आला. ती खूप घाबरत होती. १४ ऑगस्टला तिला दवाखान्यात नेलं आणि मग घरी आणलं. त्याच दिवशी माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी माझ्या पतीला सांगितलं की तिच्यासोबत शाळेत काहीतरी झालंय. माझ्या पतीने सांगितलं की ती काही बोलली नाही, तिला ताप आहे, तिला सारखा ताप येत आहे. नंतर माझ्या पतीला संशय आला कारण माझी मुलगी रडायची, झोपेत हातवारे करायची. त्यामुळे माझे पती तिला १५ ऑगस्टला दवाखान्यात घेऊन गेले, तिथे महिला डॉक्टरने तपासणी केली. त्या डॉक्टरांनी सांगितलं की मुलीला गुप्तांगात १ सेंटीमीटरपर्यंत इजा झाली आहे. कुणीतरी काहीतरी केल्यामुळेच ही इजा होऊ शकते असं डॉक्टरांनी सागितलं. त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा सल्लाही दिला.
आम्ही मुलीला विचारलं की तुला कुठे दुखतंय का, काय झालंय का? कुणी तुला हात लावला का? तेव्हा तिने सांगितलं की शाळेतला एक दादा आहे, तो मला हात लावतो. मला गुदूगुदू करतो, मारतो पण.
१६ ऑगस्टला आम्ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला गेलो. शितोळे मॅडमला सांगितलं की आम्हाला शाळेविरोधात तक्रार करायची आहे, असा असा प्रकार झाला आहे. शितोळे मॅडमने माझ्या मुलीला प्रश्न केले. नाव काय कुठे राहते. शितोळे मॅडमचा ड्रेस बघून माझी मुलगी घाबरली, थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. जेव्हा त्या सिव्हिल ड्रेसवर आल्या तेव्हा माझ्या मुलीने त्यांना सर्व सांगितलं. वॉशरुमला गेल्यावर शाळेतला काठीवाला दादा गुदूगुदू करतो, मला मारतो, फ्रॉक वर करतो, असं तिने सांगितलं.
तरीही पोलिसांनी तक्रार घेतली नाही. खासगी डॉक्टरांचे रिपोर्टही पोलिसांना दाखवले. तेव्हा शितोळे मॅडमने आम्हाला बाजुला घेतलं आणि म्हणाल्या की तिला सायकल चालवल्यामुळे असं झालं असेल. आम्ही सांगितलं की तिला सायकल चालवायला येत नाही आणि तिच्याकडे सायकल पण नाही. रात्री ९ वाजेपर्यंत हे सारं सुरु होतं. त्यानंतर रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
त्यानंतर रात्री साडेबारा-एकच्या दरम्यान मुलीला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात मेडिकलसाठी नेलं, तिथे मेडिकलची सुविधा नव्हती. तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला आलो. त्यानंतर शितोळे मॅडम म्हणाल्या की आपल्याला उल्हासनगरला जायचं आहे. त्यानंतर उल्हासनगरला गेलो, तिथे सकाळी ४ वाजेपर्यंत आम्ही बसून होतो. तिथे माहिती घेतली आणि पेपरवर्क केलं. जबाब लिहून घेतला. मुलगी काहीही बोलत नव्हती.
शाळेत गेलो तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले की आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही. आम्ही सगळ्या महिला ठेवल्या आहेत, कुणी पुरुष नाही. १०-१५ मिनिटांनी विषय बदलला. सीसीटीव्ही बंद आहेत, कॅमेरा चालू आहे, पण रेकॉर्डिंग होत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या छोटाशा चुकीमुळे आज जो कोण तो आरोपी आहे सुटला आहे.
खूप मानसिक तणाव आहे. पण तो आम्ही मुलीसमोर दाखवू शकत नाही. तिला जेवढं नॉर्मल करता येईल तेवढा प्रयत्न आम्ही करतो आहे. झोपते ती आणि अचानक उठते, रडायला लागते, मी या शाळेत जाणार नाही, दुसऱ्या शाळेत जायचं असं म्हणते.
आमची मुलगी व्यवस्थित राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे. तिला पुढे आयुष्य आहे, तिचं कुठे नाव येऊ नये. तसेच, त्या शाळेतल्या सर्व मुलींचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. राज ठाकरेंचे आभारी आहोत की त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या, असं त्या चिमुरडींच्या पालकांनी सांगितलं.