Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आम आदमी पक्षाच्या वतीने परभणी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संग्राम घाडगे पाटील यांनी मराठवाड्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली.
पुढे बोलताना संग्राम घाडगे म्हणाले, की आम आदमी पक्षाचे दिल्ली येथे सरकार आहे. त्या सरकारने पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मुलांचे शिक्षण असेल किंवा ३०० युनिट पर्यंत वीज मोफत, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत सोयी दिल्लीकरांना आम आदमी पार्टीच्या सरकारने सुखकर करून दिले आहेत. त्यामुळेच दिल्लीनंतर पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाने आपले सरकार स्थापन केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आम आदमी पक्ष आता देशातला चार नंबरचा पक्ष बनला आहे. महाराष्ट्रामध्ये ही आम आदमी पक्ष वाढवण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष स्वबळावर २८८ जागा लढणार आहे. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, महिलांचे अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, युवक बेरोजगार आहे या प्रमुख बाबींकडे लक्ष देणार असल्याचेही घाडगे म्हणाले.
यावेळी घाडगे पाटील यांनी मराठवाड्यातील तीन उमेदवारांची घोषणा केली. परभणी विधानसभा मतदारसंघातून सतीश चकोर, बीड विधानसभा मतदारसंघातून अशोक येडे पाटील, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अश्विन नवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येणाऱ्या एक महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आम आदमी पक्ष जाहीर करेल असेही ते म्हणाले.
आम आदमी पक्ष या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार असून या पक्षाला या निवडणुकीत कशा प्रकारचे यश मिळते हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, पण एक सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पक्ष या निवडणुकीत तयार झाला तर येणाऱ्या काळात हा पक्ष राज्यात आणखीन मजबूत होऊ शकतो.
परभणीच्या बकाल अवस्थेला सर्वच पक्ष जबाबदार – जिल्हाध्यक्ष सतीश चकोर
परभणी शहरासह जिल्ह्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. शहरात खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच कळत नाही. रस्त्यावरून जात असताना प्रचंड धूळ डोळ्यांमध्ये आणि नाकामध्ये जाते. शहराला पंधर दिवस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. परभणी जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारची औद्योगिक वसाहत नाही. जिल्ह्याच्या दुर्दशेला सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी जिम्मेदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी परभणी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार आहे असे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी सांगितले.