Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Girl Missing Cases: नवी मुंबईतून मुली होतायत गायब? ७ महिन्यांची धक्कादायक आकडेवारी, ‘या’ भागात सर्वाधिक घटना

9

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पोलिस आयुक्तालयातून गेल्या सात महिन्यांत १९५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १७२ मुलींचा शोध लागला असला तरी २२ मुली अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये १९ गुन्हे पोक्सोअंतर्गत वर्ग करण्यात आले असून शहरातील मुलींच्या बेपत्ता होण्याची या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये सर्वाधिक अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या घटना सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.ठाणे जिल्ह्यातील नियोजित शहर असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक उपाययोजनांची व्यवस्था असली तरी या भागातील अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी २०२३ पासून जुलै २०२४पर्यंतच्या दीड वर्षांच्या कालावधीत सुमारे ६०० अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांत झाली. यात मुलींची संख्या ४००पेक्षा अधिक आहे. यातील ५६० मुलामुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच, स्थानिक पोलिसांना यश आले आहे. जानेवारी ते १२ ऑगस्ट २०२४ या साडेसात महिन्यांच्या कालावधीत दाखल झालेल्या अपहरणाच्या एकूण २८२ गुन्ह्यांपैकी २४८ गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने उघडकीस आणले असून त्यातील १७२ मुली व ७६ मुलग्यांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले. यातील १९ गुन्हे ‘पोक्सो’साठी वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित ३४ गुन्ह्यांतील अपहृत मुलामुलींचा शोध घेण्याचे काम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून सुरू आहे, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.

परराज्यांत जाऊन शोध


नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मागील पाच वर्षांमध्ये अपहरणाच्या अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून अपहृत मुलामुलींचा शोध घेतला आहे. अपहरण झालेल्या, परराज्यांत जाऊन राहणाऱ्या मुलामुलींची कुठलीही माहिती नसताना, शोध घेतला जात आहे. परंतु तरीही ३४ गुन्ह्यांतील मुला-मुलींचा शोध लागला नसून त्यामध्ये मुलींची संख्या २२ आहे. अपहरण झालेल्या मुलांना समुपदेशनाची गरज असली तरी तशी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे सध्या या अल्पवयीन मुला-मुलींना समुपदेशन करण्याचे कामही पोलिसांना करावे लागते.

Mumbai News : आईच्या मृत्यूनंतर वडिलांकडून दोन वर्षांच्या मुलाची विक्री, असा समोर आला धक्कादायक प्रकार
मुलांमध्ये रागाने घर सोडण्याचे प्रमाण अधिक

मागील साडेपाच वर्षांमध्ये सुमारे ५०० मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून यातील ४७० मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच, स्थानिक पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. यातील बहुतांश मुले ही आईवडील अभ्यासावरून रागावल्यामुळे, खेळू न दिल्यामुळे, परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने किंवा इतर काही किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे आढळून आले आहे. तर काही मुले मजा-मस्ती म्हणून घर सोडून गेल्याचे तपासात समोर आले आहे.

झोपडपट्टी भागात अधिक घटना

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या भागात झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्ती आहे, अशा भागात अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे प्रकार समोर आले आहेत. रबाळे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी व तळोजा या पोलिस ठाण्यांच्या अन्य विभागांच्या तुलनेत मुलामुलींच्या अपहरणाचे प्रकार अधिक आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे. या भागात पोलिसांनी विशेष लक्ष देऊन हे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.