Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नजीर खान यांची महात्मा फुले चौकात पानटपरी असून, त्यांच्या समोरच शेख सुल्तान यांचा हातगाडीवर फळ विक्रीचा व्यवसाय आहे. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आठ जणांनी पान टपरीवर खरेदी केली. त्या वेळी टपरीचालकासह त्यांचा वाद झाला. शेख सुल्तान यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला असता, नजीर खान आणि सुल्तान यांच्यावर आरोपींनी वार केले. यात नजीरचा मृत्यू झाला.
‘मारेकऱ्यांना फाशी द्या,’ अशा घोषणेसह ‘फरारी तीन आरोपींना त्वरित अटक करा,’ अशी मागणी करून सकाळी दहा वाजल्यापासून दुपारपर्यंत महात्मा फुले चौकात मुस्लिम समाजबांधवांनी गर्दी केली होती. त्यांनी एक तास ठिय्या आंदोलन केले. महात्मा फुले चौकात ३००पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘फरारी आरोपींना अटक करण्यात येईल; तसेच सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे लेखी आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन चारच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, ‘पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नजीर खान यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले,’ अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक लांजेवार यांनी दिली. सचिन अण्णासाहेब पल्हाळ, आर्यन सुरेंद्र भालेराव, सागर मिलिंद शिंदे, पवन मोहन खडसान, गोकुळ भादवे, अजिंक्य रवी साळवे, अमोल जाधव व एक अनोळखी (सर्व रा. हर्सुल) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, पोलिस तीन आरोपींचा कसून शोध घेत आहेत.