Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
खड्ड्याने केला तरुणाचा घात; भगूरला रस्ता खोदकाम बेतले जिवावर, हेल्मेट असूनही दुचाकीस्वार ठार, काय घडलं?
भगूर नगरपालिकेकडून वेताळबाबा रोडवर तुळसा लॉन्सजवळ जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून अमित रामदास गाढवे (वय ४४, रा. करंजकर गल्ली, भगूर) हे जागीच ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो आहे. या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होऊन शहरातील खड्डे बुजतील काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.
परिसरातील जलवाहिनीस गळती लागल्याच्या तक्रारींनंतर शनिवारी सकाळी या वर्दळीच्या रस्त्यावर दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही तो बुजविण्यात आला नव्हता. त्यातच दुपारनंतर जोरदार पाऊस झाल्याने हा खड्डा पाण्याने भरून गेला. त्यामुळे त्याचा अंदाजच येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. दुर्दैवाने सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास याच रस्त्याने कामानिमित्त बाहेर गेलेले अमित गाढवे दुचाकीवरून हेल्मेट परिधान करून घरी परतत असताना पाण्याने भरलेल्या या खड्ड्याचा त्यांना अंदाजच न आल्याने ते दुचाकीसह खड्ड्यात पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ कॅन्टोन्मेंट, तसेच जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले.
कुटुंबाचा हिरावला आधार
नाशिकमधील गोळे कॉलनीतील औषधांच्या दुकानात कामाला असलेल्या अमित गाढवे यांचे वडील रामदास गाढवे भगूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बालाजी मंदिराबाहेर दूध-दही विक्रीचा हातगाडा लावायचे. मात्र, तो व्यवसाय बंद पडल्याने ते एका उपाहारगृहात काम करतात. अमित त्यांचा एकुलता मुलगा असल्याने या कुटुंबाचा प्रमुख आधारच एका खड्ड्यामुळे हिरवला गेला. अमित यांच्या पश्च्यात आई-वडील पत्नी आणि तीन मुली असा परिवार असून, अमित यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
कुटुंबीय, स्थानिकांचा आक्रोश
या दुर्घटनेचा व्हिडीओ एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तो परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. रविवारी दुपारी मृत अमित यांचे वडील रामदास, पत्नी कविता, तिन्ही मुली, तसेच माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मंगेश करंजकर, भाजपचे शहराध्यक्ष प्रसाद आडके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, ‘मनसे’चे तालुका अध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष कैलास भोर, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख, माजी शहराध्यक्ष विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे, कैलास गायकवाड, माजी नगरसेवक शरद उबाळे, मनोज कुवर आदींसह नागरिकांनी भगूर नगरपालिका कार्यालयासमोर जमत या अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
खड्डा अनधिकृतचा दावा
वेताळबाबा रोडवरील या कामाबाबत लेखी किंवा तोंडी असे कोणतेही आदेश आपण दिलेले नसल्याचे भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या घटनेस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नगरपरिषद शाखेकडे चौकशी करण्यासाठी अहवाल तयार करून पाठविणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. नगरपालिकेस शनिवारी सुट्टी असतानाही संबंधित रस्ता खोदण्याचे काम कसे काय केले गेले याबाबत चौकशी होईल. नगरपालिका हद्दीतील अशी कामे वार्षिक कंत्राटी पद्धतीने केली जातात. मात्र, या दुर्घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराचे काम थांबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मदतीचे लेखी आश्वासन
भगूर येथील सामाजिक व राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जमलेल्या नागरिकांनी मृत अमित यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी त्यांची आर्थिक स्थिती सर्वसाधारण असल्याने मृत्यू झालेल्या अमित गाढवे यांच्या पत्नी कविता यांना नगरपालिकेत योग्य जागी नोकरी देण्यासह तिन्ही मुलींना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याबाबत पुढाकार घेण्याचे लेखी आश्वासन दिले.
मटा भूमिका
कुठलीही परवानगी न घेता खड्डा खोदणारे, तसेच घटनास्थळी साधा खबरदारीचा फलक वा इतर उपाय न करणाऱ्या नगरपालिकेविरुद्ध थेट मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल व्हायला हवा. पालिकेच्या थातुरमातूर आश्वासनाने जीवित हानी भरून निघणार आहे काय? गेलेला माणूस व्यस्था परत आणू शकेल काय? तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळेल काय? ठेकेदाराला निलंबित करणे वा त्याचे कंत्राट रद्द करण्याइतके नागरिकांचे जीव स्वस्त झाले आहेत काय? खरेतर या खोदकाम मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन दोषी ठेकेदार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यास तसा संदेश राज्यभर जाऊ शकतो. यानिमित्ताने अनधिकृत खोदकाम, खड्डे, तसेच भ्रष्ट कारभारातून बनलेल्या दर्जाहीन रस्त्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या भूगरच काय संपूर्ण जिल्हा आणि राज्यातही खड्ड्यांनी घायाळ नसलेला रस्ता सापडणे दुर्मीळ. आणखी किती बळी गेले म्हणजे अवैध खोदकामे थांबतील? चंद्रविवरांच्या आकाराचे खड्डे बुजतील?