Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटामुळे काही नागरिकांना बहिरेपणाची समस्या उद्भवली आणि काहींना हृदयविकाराचे झटके आल्याच्याही घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेले वर्षभर सातत्याने वृत्त प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकावर लावण्याच येणाऱ्या बीम लाइट आणि लेझर बीम लाइटवर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी लेझर बीम लाइट लावल्यास, कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दहा दिवसांपूर्वी दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर लेझर आणि बीम लाइटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. त्यामुळे आता दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोस्तवात लेझर बीम लाइट वापरता येणार नाहीत.
अवकाशात लाइट सोडण्यास बंदी
शहर पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकानुसार आकाशात बीम लाइट किंवा लेझर बीम लाइट सोडण्यास बंदी आहे. गणेशोत्सवात किंवा दहीहंडी वेळी लावण्यात येणारे लेझर बीम लाइट फिरते असतात. यापूर्वीच्या मिरवणुकांमध्ये हे लाइट आकाशात सोडले जात असल्याचे दिसून आले आहे.
शहरात बीम लाइटवर कायमच बंदी असते. त्यात आता दुरुस्ती करून लेझर बीम लाइटवरही बंदी घातली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- रंजनकुमार शर्मा, पोलिस सहआयुक्त
‘लेझर बीम’वर नियंत्रणाचा कायदाच नाही
धार्मिक सण-उत्सव, राजकीय कार्यक्रम व अन्य समारंभांमध्ये कर्णकर्कश ध्वनियंत्रणेसह डोळे दुखविणाऱ्या ‘लेझर बीम’विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उत्सवांमध्ये ‘लेझर बीम’च्या वापराचा ‘ट्रेंड’ वाढत असून, त्यामुळे अनेकांची दृष्टी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. नेत्रघातक ‘लेझर बीम’च्या वापरावर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा व नियमावली नाही, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर, सार्वजनिक ठिकाणी लेझर बीमच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारला निवेदन द्यावे; तसेच या संदर्भातील तक्रारींवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १२५ किंवा अन्य तरतुदींप्रमाणे कारवाई करता येईल, असे पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
उत्सव साजरा करताना ‘बीम लाइट’ किंवा ‘लेझर बीम लाइट’चा वापर करण्यास पुढील ६० दिवस बंदी असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई करण्याचा इशारा पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्याने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास या कलमानुसार कारवाई केली जाते. त्यानुसार आरोपीला सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.