Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिल्पकार आणि कन्सल्टंटवर गुन्हा दाखल
मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रेणी १चे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी या प्रकरणाची फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्रपुरुष असून सदर पुतळ्याची सुरक्षितता विचारात घेवून पुतळा शतकानुशतके सुस्थितीत आणि सुरक्षित उभारण्याच्या दृष्टीने परिपूर्ण बनवणं आणि त्यासंदर्भात आवश्यक ती सर्वोतोपरी काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं होतं. परंतु सदर पुतळा बनवणारे शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्स्लटंट यांनी पुतळा कोसळला, तर लोकांचे प्राण जातील तसंच अपरिमित जीवित आणि वित्तहानी होईल याची पूर्ण जाणीव असतानाही पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष करुन निकृष्ट दर्जाची उभारणी केलेली आहे.
जयदीप आपटे, प्रोप्रायटर मेसर्स, आर्टिस्टरी, डॉ. चेतन एस. पाटील, स्ट्रक्चरल कन्स्लटंट यांनी एकमेकांच्या संगनमताने राजकोट, मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना परिपूर्ण अभ्यास न करता निकृष्ट दर्जाचा उभारल्याने पुतळ्याजवळ आलेले पर्यटक आणि इतर लोकांचा मृत्यू होईल याची जाणीव असताना तसं बांधकाम आणि उभारणी केली.
मानवी जीवित हानी करण्याचा प्रयत्न झाला
पुतळा २६ ऑगस्ट रोजी तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा मृत्यू घडून येईल अशा परिस्थितीत पडला, त्यामुळे त्यांनी मृत्यू घडवून आणण्याची कृती केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी चुकीच्या आणि निकृष्ट पध्दतीने पुतळा उभारणी केल्याने मानवी जीवित हानी करण्याचा प्रयत्न केला. तसंच, शासनाकडून पुतळा उभारणीसाठी उपलब्ध करुन घेतलेल्या निधीचा योग्य वापर न करता निकृष्ट बांधकाम करुन शासनाची फसवणूक केली आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान कैले म्हणून माझी जयदीप आपटे, प्रोप्रायटर मेसर्स, आर्टिस्टरी, डॉ. चेतन एस. पाटील, स्ट्रक्चरल कन्स्लटंट यांच्याविरुध्द कायदेशीर फिर्याद देत असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी जबाबात म्हटलं आहे.
शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट जबाबदार- पालकमंत्री
हा पुतळा उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया ही नौदलाच्या अखत्यारीत झाली आहे. हा पुतळा उभारण्याचं काम हे कंत्राटदार जयदीप आपटे यांच्या आर्टिस्टरी या कंपनीला देण्यात आले होते. डायनॅमिक स्ट्रक्चरचे डॉ. चेतन एस पाटील हे या कामाचं स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते. या कामाची वर्क ऑर्डर देखील नौदलाकडूनच देण्यात आली होती. जर केवळ ८ महिन्यांमध्ये अशी दुर्घटना घडत असेल, तर त्याला शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट हीच मंडळी जबाबदार आहेत.
समुद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा जॉइंट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट बोल्टला गंज पकडला होता. यातूनच ही दुर्घटना घडली असावी, असं प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला दिलं होतं.
तरीही आज घडलेल्या दुर्घटनेमुळे आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील दोषींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. कुठलाही शिवप्रेमी या दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना माफी देणार नाही! तसेच शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेत लवकरात लवकर याठिकाणी पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही देतो असं पालक मधील जवेंद्र चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.