Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Tanaji Sawant vs NCP : राष्ट्रवादीसोबत कॅबिनेटमध्ये सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते, या आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या विधानावरून महायुतीत वादाला तोंड फुटले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीसोबतच्या महायुतीवर सडकून टीका केली. ‘आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आयुष्यात आपले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कधीही पटलेले नाही. आज जरी राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात. आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे,’ असे विधान सावंत यांनी केले. Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणूक फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावंत यांना लक्ष्य केले. ‘तानाजी सावंत नाव असलेले महाराष्ट्रात बरेच आहेत. तानाजी सावंत यांना विचारून आम्ही मंत्रिमंडळात सामील झालेलो नाही. त्यांना आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. लोककल्याणकारी योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहेत. पण, कोणी मिठाचा खडा टाकत असेल तर त्याला आवरण्याची गरज आहे,’ असे तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंत यांना ‘एक्स’वर प्रत्युत्तर दिले. ‘जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, धाराशीव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करू शकतात आणि अजित पवार यांच्याकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलू शकतात,’ अशी उपरोधिक टीका मिटकरी यांनी केली. भाजपकडून काँग्रेसला धक्का! जितेश अंतापूरकरांचा पक्षप्रवेश, अशोक चव्हाणांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही सावंत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. ‘तानाजी सावंत यांचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला साजेसे नाही. अशा वक्तव्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा दर्जा खालावतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यभर जे काम सुरू आहे ते मंत्र्यांच्या अशा वक्तव्यांमुळे झाकोळले जाते. आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय स्पष्ट आहेत. आमच्या पक्षनेतृत्वाबद्दल वावगे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले कधीही चांगले. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही. एकतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे, अन्यथा आम्ही सरकारमधून बाहेर पडतो,’ असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.