Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jode Maro Andolan: महाविकास आघाडीतर्फे महायुतीविरोधात आज, रविवारी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले आदी नेते सहभागी होणार आहेत.

राजकोट किल्ल्यावर डिसेंबर २०२३मध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. याचा आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पालघर येथील कार्यक्रमात शिवप्रेमींची या दुर्घटनेबद्दल माफी मागितली होती.
परंतु, पंतप्रधानांच्या माफीनंतरही सरकारविरोधात आंदोलन होणार आहे, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. ‘शिवद्रोह्यांना माफी मिळणार नाही,’ असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही, ‘राजे, आम्ही येत आहोत, तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवायला,’ अशी पोस्ट ‘एक्स’वर केली आहे. आघाडीच्या घटकपक्षांतील सर्व शीर्षस्थ नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी १ वाजल्यापासून हुतात्मा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे.
निवडणुकांवर डोळा ठेवून पंतप्रधानांची माफी : राऊत
‘पुतळा दुर्घटनेप्रकरणी माफी मागितली नाही, तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावे लागेल, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. ही माफी पूर्णपणे राजकीय आहे, असे टीकास्त्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी सोडले. ‘उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी, अशी भावना यामागे आहे. यामध्ये महाराजांविषयी, महाराष्ट्राविषयी प्रेम, आत्मीयता यांचा प्रश्नच येत नाही,’ असेही राऊत म्हणाले.महाराजांनी भ्रष्टाचार, निष्काळजीपणाला माफी दिली नाही; मोदीजी, प्रायश्चित अटळ आहे- शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तीची टीका
सावरकरांची महाराजांशी तुलना आक्षेपार्ह : जयंत पाटील
मालवण येथे छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवप्रेमींची माफी मागितली. त्यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे माफी मागणार का?’ असा प्रश्न त्यांनी केला होता. त्यावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांशी सावरकरांची तुलनाच होऊ शकत नाही. भाजपचे नेते तसे करत असतील तर ते आक्षेपार्ह आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी-शप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची कुणीही माफी मागितली तरी ती मिळणार नाही, याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खात्री आहे. म्हणून त्यांनी माफी मागितलेली नाही. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. मराठी जनतेचा हा अपमान आहे. पंतप्रधानांनी माफी मागून हा विषय संपविणे गरजेचे होते. पण त्यांनी सावरकरांची तुलना शिवाजी महाराजांशी करून शिवप्रेमींना आणखी दुखावले आहे,’ असे म्हणाले.