Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ganeshotsav 2024: गावात पाणी नाही, म्हणून गणपती मुंबईत आणला; कोकणातील ‘या’ गावाचा उलटा प्रवास

5

Ganeshotsav 2024: चिपळूण तालुक्यातील ओंबळी गावकरवाडीतील पाच कुटुंबांना नळाला पाणीच येत नसल्याने यंदा गावचा गणपती मुंबईला आणण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
chipun ganeshotsav
चिपळूण: राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर जल योजना या नळाद्वारे पाणी योजनांद्वारे प्रत्येकाच्या घरात पिण्याचे पाणी पोहोचावे यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील असले तरी कोकणातील चिपळूण तालुक्यात ओंबळी गावकरवाडीतील पाच कुटुंबांना नळाला पाणीच येत नसल्याने गावचा गणपतीही यंदा मुंबईला नेण्याची वेळ आली आहे. आपले सरकार पोर्टलद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २१ ऑगस्ट रोजी तक्रार करूनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी संपर्कही साधला नसल्याची खंत दुर्गेश खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोकणात प्रत्येक घरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईतील कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र चिपळूण तालुक्यातील ओंबळी गावकरवाडीतील पाच कुटुंबांना नळाला पाणीच येत नसल्याने यंदा गावचा गणपती मुंबईला आणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात पागोळ्यांचे पाणी एका टाकीत साठवून ते आम्ही गावी गेल्यावर वापरतो व पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला आजही वणवण करून पाणी आणावे लागते, अशी खंत खेडेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सजवळ बोलताना व्यक्त केली.

आम्ही दरवर्षी आमच्या गावाला जाऊन होळी, नवरात्री व गणेशोत्सव साजरा करतो. कोकणात होळी-गणपतीच्या उत्सवात संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि हे सण साजरे केले जातात. आम्हीही या सणासाठी गावी जातो व त्यावेळी २५-३० जणांचे आमचे नातेवाईक एकत्र येतात. आमच्या दारात नळ आहे, परंतु त्याला पाणीच येत नाही. सबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने पाण्याची वाहिनी टाकली आहे अशी तक्रार आहे. त्यामुळे आमच्या घरांमध्ये पाणीच येत नाही. कूपनलिका खोदण्याचाही प्रयत्न झाला, परंतु तेथे पाणी लागले नाही. आमची घरे काहीशी उंचावर असल्याने ही समस्या कायमस्वरूपी आहे. अशा परिस्थितीत आम्हाला किमान गणेशोत्सवाच्या काळात दारात असलेल्या नळाला पाणी मिळावे, अशी माफक अपेक्षा या तक्रारीत आम्ही नमूद केली आहे.
Ganeshotsav Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जायचंय? ही बातमी जरुर वाचा, कोकण अन् मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
दुर्गेश मोरेश्वर खेडेकर यांनी सांगितले की, सरकारकडून केवळ आश्वासने देण्यापलीकडे काही केले जात नाही. आम्ही या मूळ गावचे असलो या गावातील मतदार नसल्याने आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दुर्गेश मोरेश्वर खेडेकर तसेच स्वप्नील बेर्डे, राजेश खेडेकर, विजय बेलवलकर, विजय ओम्बलकर, योगेश ओम्बलकर, जयू परब यांनी आपले सरकार पोर्टलवर पाण्याच्या या दुरवस्थेबाबत तक्रार केली आहे.

या गावचे उपसरपंच जितेंद्र कदम यांनीही याबाबत माहिती दिली. गावातील पाणी योजना ही ४० वर्षे जुनी आहे त्यामुळे हे पाणी त्या ठिकाणी जात नसावे. हर घर जल ही नळपाणी योजना मंजूर झाली असून तिचे काम चालू आहे. या नवीन योजनेद्वारे गावकरवाडीतील या घरांना नळाद्वारे नक्की पाणी मिळेल. हा प्रश्न आम्ही स्वतः सोडवू, असे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.