Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रेल्वे धाव रे, कोकण दाव रे… गणरायाच्या भेटीसाठी चाकरमान्यांचा प्रवास कसा असतो, ऑन द स्पॉट रिपोर्ट

5

Ganpati Special Trains: येत्या २४ तासांत घराघरांत लाडक्या गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशविदेशांत गणेशोत्सव दिमाखात साजरा होत असला तरी कोकणात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा खास असतो. त्यासाठीच कोकणवासी मोठ्या संख्येने गावी जातात. या पार्श्वभूमीवर मुंबईतून मध्यरात्री धावणाऱ्या गणपती विशेष गाड्यांचा प्रवास नेमका कसा सुरू होतो, याचा आढावा घेणारा हा ‘ऑन द स्पॉट’.

महाराष्ट्र टाइम्स
ganpati special trains
महेश चेमटे, मुंबई : वेळ : बुधवारी, रात्री ११.४५ वाजता
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

पावले चालती फलाटाची वाट


देशाच्या विविध भागांत जाणारे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) आपल्याला इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत आहेत. सीएसएमटीमधील फलाट क्रमांक ८ समोरील मोकळ्या जागेत प्रवासी बसतात. त्याच वेळी उद्घोषणा होते, ‘गाडी क्रमांक ०११५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस थोड्याच वेळात फलाट क्रमांक १०वर येत आहे.’ ही उद्घोषणा कानी पडताच हातातील बॅगा सावरत कोकणावासी फलाट क्रमांक १० च्या दिशेने झपाझप पावले टाकण्यास सुरुवात करतात.

रांगेचा लाभ सर्वांना
नियमित रेल्वेगाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने विशेष रेल्वे गाड्या घोषित होण्याची वाट पाहायची आणि विशेष गाडी सुटण्याच्या दिवशी चालू तिकीट काढायचे आणि जनरल डब्यातून प्रवास करत कोकण गाठायचे, असा शिरस्ता सर्वसामान्य कोकणवासीयांचा असतो. सालाबादप्रमाणे कोणत्याही मदतीशिवाय रेल्वेगाडीच्या दोन्ही दिशांना जनरल डबा येणाऱ्या ठिकाणी कोकणवासी रांगेत उभा राहतात. अनेकजण रांगेत आपल्या नंबरच्या जागी स्वतःची ‘बॅग’ उभी करतात. सहकुटुंब प्रवास करणारा कोकणवासी आपल्या लेकरांबाळासह रांगेतच बस्तान मांडून बसतो. रांगेत लवकर क्रमांक यावा आणि आपल्याला खिडकीजवळचे आसन मिळावे, यासाठी रात्री बाराच्या गाडीसाठी दुपारपासूनच रांग लावली जाते. कारण रांगेचा लाभ सर्वांना अशी कोकणवासीयांची धारणा आहे.

प्रवाशांची कसरत वाचली
मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी विशेष एक्स्प्रेस फलाटावर दाखल झाली. रेल्वेगाडीचा सामान्य डबा लागताच प्रवाशांनी आरडाओरडा सुरू करत डब्यांचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. सामान्य डब्यांचे काही दरवाजे प्रवाशांनी उघडून आत प्रवेश करत जागा मिळवली. मात्र, अजूनही मोठी रांग फलाटावर उभी होती. विशेष म्हणजे, डब्यात गेलेला प्रवासी डब्यातील बंद दरवाजे उघडण्यास तयार नसल्याने फलाटावरील प्रवासी डब्याच्या आतील प्रवाशांना कोकणी भाषेत शिव्यांची लाखोली वाहत होते. कसेही करून डब्यात प्रवेश करून जागा पकडण्यासाठी काहींनी डब्यातील आपत्कालीन खिडकीतून बॅगा आत टाकत जागा अडवण्याचा प्रयत्न केला. काहींनी याच खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळेस डब्याचा दरवाजा उघडल्याने प्रवाशांची कसरत वाचली.

गाडी वेळेत आली
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या सामान्यपणे विलंबाने धावतात, असा कोकणवासीयांचा अनुभव आहे. गेल्या काही दिवसांत सावंतवाडी विशेष गाडी मध्यरात्री १२.२० ऐवजी मध्यरात्री ३.३० वाजता धावली होती. मात्र, बुधवारी उद्घोषणा झाली, फलाटावर गाडी आली, मध्यरात्री १२.२० ला रवानाही झाली. यामुळे रेल्वेगाडीतील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला धन्यवाद दिले.

‘आरपीएफ’चा जागता पहारा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस संवेदनशील रेल्वे स्थानक आहे. गणेशोत्सव काळातील नियमित आणि विशेष गाड्यांना गर्दीमुळे सीएसएमटीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा मध्यरात्री जागता पहारा असल्याचे दिसून आले. तिथे परवानगीविना छायाचित्रण करता येत नाही. त्यासाठी विशेष दक्षता आरपीएफकडून घेण्यात येते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकात अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारीही आरपीएफकडून घेण्यात आल्याचे दिसून आले.

‘व्याजासह पैसे परत करा ’

‘७ मे रेाजी कोकणमार्गावरील तिरुवनंतपुरम गाडीचे प्रतीक्षा तिकीट काढले. मात्र ४ सप्टेंबरपर्यंत ते कन्फर्म झाले नाही. कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे कन्फर्म तिकीट मिळाले नाही. यामुळे विशेष रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करण्यासाठी आलो. रेल्वेने चार महिने पैसे वापरले असून व्याजासह परतावा मिळायला हवा’, असे यशवंत जाधव या प्रवाशाने सांगितले. डोंबिवलीहून पत्नी आणि मुलीसह सीएसएमटीला येण्यासाठी सायंकाळी सात वाजता घर सोडले. पावणेनऊ वाजता सीएसएमटीला येऊन सामान्य डब्यासाठी रांग लावली. विशेष गाडी मध्यरात्री बारानंतर सुटणार असल्याने फलाटावरच जेवण केले. सीएसएमटी ते सावंतवाडी असा प्रवास मध्यरात्री १२.२० वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी २.२० वाजता संपणे अपेक्षित आहे. कोकणातील एकाच रेल्वे मार्गामुळे अनेकदा रेल्वे गाडया सायडींगला उभ्या करतात. विशेष गाडीला पोहोचता पोहोचता २ ते ३ तासांचा विलंब होणार, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
गरमागरम पाण्याने टकाटक आंघोळ करा, ‘वंदे भारत’ स्लिपर लवकरच रुळावर, कधी सुरु होणार? भाडे किती?
-गणेशोत्सवातील गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने दिव्यावरून अनारक्षित रेल्वेगाड्या चालवायला हव्यात. मुंबईहून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये दिव्यात बसायला जागा मिळत नाही.– आशीष आंग्रे ( दिवा )

– गणपतीत दरवर्षी कोकणवासीयांचे हाल होतात. केवळ उत्सव कालावधीत आमची चर्चा होते. उत्सव संपला की आमचा राजकीय नेताही आमच्याबाबत बोलत नाही. हेच कोकणवासीयांचे दुर्दैव.– विजय खांडेकर (दिवा)

-ऐन गणेशोत्सवात ३००-४०० रुपयांत सीएसएमटी ते कुडाळ पोहोचवणारी गाडी म्हणजे रेल्वे. एसटी आणि खासगी बसच्या तुलनेत रेल्वे प्रवास केव्हाही उत्तम असल्याने गर्दी असली तरी रेल्वेनेच कोकणात जातो. – प्रकाश मांढरेकर (मालाड)

– कोकणातील एक मार्ग असल्याने गाड्या सायडिंगला उभ्या राहणे आणि प्रवासी रखडणे हे वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदाही त्यात काडीमात्र बदल नाही. पत्नी आणि मुलींचे तिकीट कन्फर्म झाले. केवळ पाचच दिवस सुट्टी असल्याने सामान्य डब्यातून निघालो.– सूरज चौघुले (भांडुप)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.